प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण का नाही? उद्धव ठाकरे म्हणतात….

| Updated on: Aug 30, 2023 | 7:46 PM

प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. इंडिया आघाडी ही भाजप विरोधात रणनीती आखत आहे. त्यामुळे सर्व विरोधक एकत्र येत आहेत. असं असताना प्रकाश आंबेडकर यांना मुंबईतील बैठकीचं निमंत्रण नाही.

प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण का नाही? उद्धव ठाकरे म्हणतात....
Follow us on

मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : इंडिया आघाडीची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. इंडिया आघाडीची उद्यापासून दोन दिवस बैठक असणार आहे. या बैठकीचं निमंत्रण अनेक विरोधी पक्षांना देण्यात आलं आहे. पण राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत प्रकाश आंबेडकर यांची मैत्री आहे. मुंबईत एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर एकत्र आले होते.

आगामी निवडणुका एकत्र लढू, असं प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. पण तरीही प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत समाविष्ट करण्यात आलेलं नाही. याशिवाय त्यांना इंडिया आघाडीच्या बैठकीचं देखील निमंत्रण देण्यात आलेलं नाही. याबाबत महाविकास आघाडीच्या आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सविस्तर भूमिका मांडली.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले.

“आम्ही प्रकाश आंबेडकर आणि आमची युती गेल्या 23 जानेवारीला जाहीर केली आहे. साहजिकच आहे, त्यांची गोष्ट बरोबर आहे. शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची युती आम्ही जाहीर केलेली आहे. इंडियाच्या आघाडीत येण्यासाठी त्यांची इच्छा आम्हाला जाणून घ्यावी लागेल. याबाबत प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलून त्यांची इच्छा विचारावी लागेल”, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

“आम्ही एकदा एकत्र आलो की वेगळे होणार नाही. एकत्र आल्यावर वेगळं होण्यासाठी एकत्र येत नाही. त्यामुळे याबाबत त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा करु, त्यांची तयारी असेल तर इंडिया आघाडीत ते पण येऊ शकतात”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया

“आम्ही शिवसेनेबरोबर अजून आहोत. आम्हाला निमंत्रण का दिलं नाही? याबाबत काँग्रेसला विचारलेलं अधिक बरं. मागच्याही 2019 च्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसला ऑफर दिली होती. यावेळेसही आम्ही ऑफर दिलेली आहे. पण काँग्रेसच निमंत्रण देत नसल्यामुळे आम्ही त्या आघाडीत नाहीत, अशी परिस्थिती आहे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“आमची भूमिका म्हणजे आम्ही उद्धव ठाकरे, आमचे वकीलच दिलेला आहे, त्याने आमची बाजू लढावी. आमचे वकील हे उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी आता एनडीएत भूमिका मांडावी. आम्हाला इंडिया आघाडीच्या बैठकीत बोलवत नाहीत हे त्यांना माहिती आहे. मला ज्यादिवशी काँग्रेसवाले बोलतील तेव्हा मी त्यांना विचारुन घेईन की तुम्ही आम्हाला का लांब ठेवता?”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

“शिवसेनेने स्वत:ची भूमिका ठरवली पाहिजे. शिवसेना आजच्या बैठकीत आमच्या बाजूने बॅटिंग करतील, असं आम्ही गृहित धरु. मी महाविकास आघाडीत नाही. इंडियाचं आम्हाला निमंत्रण नाही”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिलीय.