उद्धव ठाकरे यांच्या बैठकीतली Inside Story, माजी नगरसेवकांना नेमके आदेश काय?

| Updated on: Jun 20, 2023 | 5:48 PM

उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे माजी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी पक्षाच्या पुढील वाटचालीविषयी देखील माहिती दिली.

उद्धव ठाकरे यांच्या बैठकीतली Inside Story, माजी नगरसेवकांना नेमके आदेश काय?
Uddhav Thackeray
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई : मुंबई महापालिकेची लवकरच निवडणूक लागू शकते. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाच्या माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या माजी नगरसेकांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी पक्षाची पुढील वाटचालही सांगितली. या बैठकीतली इनसाईड स्टोरी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. उद्धव ठाकरे या बैठकीत नेमकं काय म्हणाले? याबाबतची माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरे मला घरगड्या सारखं वागत होते, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात केलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत भूमिका मांडली. घरगड्याला कुणी नगरविकास मंत्री करतं का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी बैठकीत उपस्थित केला. तसेच कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी आपल्या माजी नगरसेवकांना केली.

उद्धव ठाकरे बैठकीत काय-काय म्हणाले?

एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने शेतात जातात याचा आनंद आहेत, पण हेलिकॉप्टर उतरण्याऐवढी शिंदेंची शेती आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच सर्व निधी एकनाथ शिंदेंचे समर्थक असलेल्या नगरसेवकांनाच दिल्याची तक्रार नगरसेवकांनी बैठकीत केली. पहिल्यांदा निवडून आलात तेव्हा तुमच्याकडे कुठे फंड होता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी निधीवरुन मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या निवडणुकीत स्वबळावर भगवा फडकवला होता, असंही उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले. तसेत अन्य पक्षाचे नगरसेवक असणाऱ्या वॉर्डातील पदाधिकाऱ्यांचीही बैठक घेणार, असं उद्धव ठाकरेंनी या बैठकीत नगरसेवकांना सांगितलं.

23 जूनच्या विरोधकांच्या बैठकीला उद्धव ठाकरे हजेरी लावणार आहेत. पाटण्यात विरोधकांची एकजूट झाल्यास चांगलेच आहे. अन्यथा माझी सर्व प्रकारची तयारी आहे, असं उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले.

चार ते पाच माजी नगरसेवकांची बैठकीला गैरहजेरी

या बैठकीला ठाकरे गटाच्या चार ते पाच नगरसेवकांची गैरहजेरी होती, अशी देखील माहिती समोर आली आहे. अनेकजणांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक आशिष चेंबूरकर हे बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांनी आपली तब्येत बरी नसल्याचं सांगितलं आहे. तसेच इतर माजी नगरसेवकांनीदेखील तेच कारण सांगितल्याची माहिती समोर आलीय.