मुंबई : शिवसेना (Shivsena) एकच आहे. एकच राहणार, ती म्हणजे आपली शिवसेना, असे उद्गार शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काढले आहेत. पुण्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची घेतली भेट घेतली, त्यावेळी शिवसैनिकांना उद्देशून ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. विजय शिवतारे (Vijay Shivtare) एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसैनिक त्यांच्याविरोधात आक्रमक झाले. शिवसेनेला सध्या बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. सामान्य शिवसैनिकांमध्ये बंडखोरांविरोधात संतापाची भावना आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी शिवसेनेतून बंड करून आणि भाजपाशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये त्याची चीड आहे. त्याच भावनेतून त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
आक्रमक शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, की हे (भाजपा) संपवायला निघाले आहेत. यांना शिवसेनेचे अस्तित्व नको आहे. त्यांना केवळ शिवसेना फोडायची नाही, तर संपवायची आहे, बळकवायची आहे. मात्र तुम्ही जोमाने कामाला लागा. कोणाच्याही दबावाला बळी पडू नका. तुमच्या मनात प्रश्न आहे, की आघाडी आहे, मग आपले काय? पण जिंकायची तयारी करा. मन घट्ट करा तर आपण विजय मिळवू. त्यासाठीच कामाला लागा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. धनुष्यबाण आपलाच आहे आणि राहणार असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
आतापर्यंत ज्यांना देता येणे शक्य होते, जेवढे देणे शक्य होते, तेवढे दिले. मात्र त्यांनी ते घेऊन त्यांचे गुण दाखवले आहेत. आत्तातरी माझ्या हातात तुम्हाला देता येण्यासारखे काहीही नाही. तुमच्या सगळ्यांच्या ताकदीने आपण ज्यांना दिले ते तर गेले मात्र देणारे माझ्यासोबत आहेत, असा विश्वास आणि उत्साह त्यांनी शिवसैनिकांमध्ये भरला. दरम्यान, शिवसेना ठाकरेंची, नाही कुणाच्या बापाची तसेच विजय शिवतारे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी विजय शिवतारेंविरोधात संताप व्यक्त केला. तसेच आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी साद शिवसैनिकांनी घातली.