ठाकरेंची उद्या डरकाळी, धारावी सज्ज; दीड लाख लोक मोर्चात येणार?

| Updated on: Dec 15, 2023 | 7:52 PM

अदानी उद्योग समूहाविरोधात ठाकरे गटाने दंड थोपाटले आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात ठाकरे गटाने अदानी उद्योग समूहाविरोधात मोर्चाचं आयोजन केलं आहे. हा मोर्चा अत्यंत मोठा असणार आहे. मोर्चात सुमारे दीड लाख लोक सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे. ठाकरे गटाने मोर्चाची प्रचंड तयारीही केली आहे. त्यामुळे या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ठाकरेंची उद्या डरकाळी, धारावी सज्ज; दीड लाख लोक मोर्चात येणार?
uddhav thackeray
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 15 डिसेंबर 2023 : अदानी समूहाविरोधात उद्या शनिवारी ठाकरे गटाचा प्रचंड मोर्चा पार पडणार आहे. स्वत: उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. त्यासाठी ठाकरे गटाने जय्यत तयारी केली आहे. उद्याच्या मोर्च्याचा निमित्ताने धारावी सज्ज झाली आहे. धारावीत ठिकठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. धारावीतील प्रत्येक घरातून माणसं मोर्चाला नेण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असून या मोर्चात दीड लाख लोक सामील होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उद्या मोर्चा होणार आहे. या मोर्चाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार बाबूराव माने यांनी या मोर्चाची माहिती दिली आहे. टी जंक्शन ते अदानी समूहालाच्या कार्यालयापर्यंत आमचा भव्य मोर्चा उद्या निघेल. या मोर्चात एक ते दीड लाख लोक सहभागी होतील. मुंबईतील अनेक नेते या मोर्च्याच्या शेवटी संबोधित करतील. पोलिसांनी परवानगी दिली नाहीतरी आम्ही या मोर्चावर ठाम आहोत, असं बाबूराव माने यांनी सांगितलं.

Shivsena Protest against Adani Group | Ground report taken by Nivrutti Babar of tomorrow’s Shiv Sena Uddhav Thackeray group’s march against Adani Group

 

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही

उद्याचा मोर्चा भव्य असेल. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आमचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी आम्ही काळजी घेऊ. धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत लोकांमध्ये संभ्रमाचा वातावरण आहे. झोपडपट्टी पुनर्विकास केला जातो त्याबद्दल स्पष्टता नाही. केवळ अदानींना फायदा देण्यासाठी त्यांच्या माध्यमातून विकास केला जात आहे, अशी माहिती बाबूराव माने यांनी दिली.

मोर्चा होणारच

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनीही मोर्चा होणारच असं म्हटलं आहे. मोर्चा फक्त धारावीसाठीच नाही तर मुंबईकरांसाठी आहे. सगळ्यांवर ताबा मिळवण्यासाठी भाजपचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना मुंबई गिळायची आहे. आम्ही ते होऊ देणार नाही. मोर्चा होणारच. या मोर्चाला मुंबईकर उपस्थित असेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

धारावीत बॅनरबाजी

दरम्यान, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात ठाकरे गटाकडून उद्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. टी जंक्शन ते अदानी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी या मार्गावर प्रचंड बॅनरबाजी करण्यात आली आहे. होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. झेंडे लावण्यात आले आहेत. त्यामुळे हा संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे.