Udhav Thackeray : निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर; मुंबईत मतदानासंदर्भातील ठाकरेंच्या आरोपांची करणार शहानिशा; पण दिला हा इशारा
Election Commission : मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या मतदानासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांची आता निवडणूक आयोग शहानिशा करणार आहे.
लोकसभा निवडणुकीत मतदानादिवशी मुंबईत मोठी अनागोंदी पाहायला मिळाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर तोफ डागली होती. त्यांच्या काही प्रश्नांमुळे निवडणूक आयोगच संशयाच्या फेऱ्यात आला होता. याप्रकरणी निवडणूक आयोगाला माध्यमांनी विचारणा केली होती. या आरोपांची आता दखल घेण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने आरोपासंदर्भातील अहवाल मागविला आहे. पण एक इशाराही आयोगाने यावेळी दिला आहे.
आयोगाने मागविला अहवाल
केंद्रीय निवडणूक आयोगाने आरोपांची शाहनिशा करण्याचे ठरविले आहे. शिवसेनेच्या उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला असल्याची माहिती समोर येत आहे. या अहवालातून त्यांनी केलेल्या आरोपासंबंधीचा खुलासा समोर येईल.
काय होते आरोप?
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात पाच टप्प्यात मतदान झाले. पाचव्या टप्यात २० मे रोजी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यांत मतदान झाले. अनेक मतदारसंघात विशेषत: मुंबई, ठाण्यात संथ मतदानामुळे मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तीव्र उन्हाळा असूनही मतदारांसाठी आयोगाने कोणतीही व्यवस्था केली नसल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याच दिवशी दुपारी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. ठाकरे यांच्या या आरोपावर नाराजी व्यक्त करीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती.
तर मग कारवाईचा बडगा
ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या भागात खरोखरच मतदान संथ होते का, मतदारांच्या रांगा लागल्या होत्या का? याबाबत वेगवेगळे पुरावे मागविण्यात आले आहे. मतदारांची अडवणूक केली जात होती का आदी मुद्द्याबाबत नेमकी वस्तुस्थिती काय होती याबाबत हा अहवाल मागविण्यात आला आहे. त्यात ठाकरे यांचे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट झाल्यास ठाकरे यांच्यावर उचित कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.