Shivsena : ‘शिवसेनेची जवळ जवळ काँग्रेस झालीय’…बड्या नेत्याचाच उद्धव सेनेला घरचा आहेर, व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये अजून काय काय?
Shivsena is almost like Congress : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर चांद्यापासून बांद्यापर्यंत आता उद्धव ठाकरे सेनेचे काय होणार हा प्रश्न आपसूक चर्चेत येतोच. त्यातच कोकणातील एका खंद्या पाठीराख्या नेत्यानंच पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
शिवसेनाची दोन शकलं पडली. राज्यात एक गट महाविकास आघडीसोबत तर दुसरा महायुतीसोबत सत्तेत गेला. लोकसभेत अभूतपूर्व असा विजय आणि विधानसभेत दारूण पराभवाने उद्धव ठाकरे गटाला आता मुंबई महापालिकेतील सत्ताकेंद्र हातचे जाणे धोक्याचे ठरणार आहे. मागील काही दिवसांपासून कोणी ना कोणी पदाधिकारी, नेता नाराजीच्या चर्चा समोर येत आहे. त्यातच कोकणातील या नेत्याने तर आता पक्षाला घरचा आहेर दिला आहे. शिवसेना आता जवळ जवळ काँग्रेस झाली आहे, असा आरसाच या बड्या नेत्याने दाखवल्याने खरी गोची झाली आहे.
भास्कर जाधव यांचे पदाधिकाऱ्यांना खडेबोल
चिपळूण येथे कार्यकर्ता बैठक झाली. या बैठकीत भास्कर जाधव यांनी धुवाधार बॅटिंग केली. त्यांनी पक्षातील मरगळीवर थेट निशाणा साधला. त्यांचा या बैठकीतील एक ऑडिओ व्हायरल होत आहे. त्यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचल्याचे दिसून येते. तर पक्षाच्या भूमिकेवर सुद्धा त्यांनी स्पष्ट मांडल्याचे दिसून येते.
शिवसेनेची जवळ जवळ काँग्रेस झाली आहे, असे खडेबोल पदाधिकार्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी सुनावले. जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमत नाही. काम न करणार्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जातं, असा खळबळजनक दावा भास्कर जाधव यांनी केला.
पदाधिकार्यांच्या कार्यपद्धतीवर जाधवांची नाराजी
शाखा प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांचा कार्यकाळ निश्चित करा असा सल्ला त्यांनी विनायक राऊत यांना दिला. निवडणूक काळात पक्षाच्या शाखा प्रमुखा पासून सर्वांच्या नावाने फतवे काढावे लागतात. निवडणूक काळातील पक्षाच्या पदाधिकार्यांच्या कार्य पद्धतीवर भास्कर जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
जुन्या शिवसैनिकांना कोण पुसतो?
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत, असा नाराजीचा सूर सुद्धा भास्कर जाधव यांनी आवळला. चिपळूणमधील पदाधिकारी बैठकीत भास्कर जाधवांनी मनातली सल बोलून दाखवली. पक्षाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी ताशेरे ओढले. या बैठकीला सचिव विनायक राऊत यांच्यासह जिल्हा प्रमुख संजय कदम यांचीही हजेरी होती.
जबाबदारीने काम करायला पाहिजे
पक्ष कठीण काळातून जात असताना नेत्यांनी जबाबदारीने काम केलं पाहिजे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट पटतेच असे नाही, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी भास्कर जाधव यांच्या या भाषणावर दिली आहे. पण आता पक्षातूनच आवाज उठत असल्याने उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.