अमित शाह रायगडावर, पण संभाजीराजे का झालेत नाराज? कारण तरी काय?
Amit Shah -Sambhajiraje : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रायगडाला भेट दिली. यावर संभाजीराजे यांची नाराजी समोर आली आहे. त्यांच्या नाराजीचे नेमकं कारण तरी काय? वाघ्या कुत्र्याच्या वादाची पार्श्वभूमी तर यामागे नाही ना? यावरून आता चर्चा सुरू झाली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काल 12 एप्रिल रोजी रायगडावर होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज हजर होते. दरम्यान या कार्यक्रमात संभाजीराजे छत्रपती हे अनुपस्थित असल्याची बाब प्रकर्षाने पुढे आली. छत्रपती शिवरायांचे वंशज या कार्यक्रमाला गैरहजर असल्याने एकच चर्चा सुरू झाली. संभाजीराजेंच्या नाराजीचे नेमकं कारण तरी काय? वाघ्या कुत्र्याच्या वादाची पार्श्वभूमी तर यामागे नाही ना? यावरून आता चर्चा सुरू झाली आहे.
संभाजीराजेंना डावललं?
अमित शाह यांच्या रायगड भेटीत संभाजीराजें छत्रपती यांना निमंत्रण देण्यात आलं नसल्याची माहिती समोर येत आहे. या कार्यक्रमात संभाजीराजेंना डावलल्याची चर्चा होत आहे. रायगड किल्ल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे व उदयनराजे भोसले यांनी ‘वाघ्या’ कुत्र्याच्या पुतळ्याच्या हटवण्याची मागणी पुन्हा केली होती.




विशेष म्हणजे संभाजीराजे हे रायगड विकास प्राधिकरणाचे प्रमुख आहेत. तरीही त्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रणच देण्यात आले नव्हते, अशी चर्चा होत आहे. काँग्रेसने यावर सरकारवर टीका केली असून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव केवळ राजकारणासाठी वापरण्यात येत असल्याचा आरोप केलाय.
वाघ्या कु्त्र्याचा पुतळा हटवा
संभाजीराजेंनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याच्या ऐतिहासिक आधारावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी सांगितले की, वाघ्या नावाच्या कुत्र्याचा उल्लेख १९१९ साली राम गणेश गडकरी यांच्या ‘राजसंन्यास’ नाटकात पहिल्यांदा झाला, आणि त्यानंतर त्याचा पुतळा उभारण्यात आला. शिवाय, वाघ्याचा पुतळा शिवरायांच्या समाधीपेक्षा उंच असल्याने हे अपमानास्पद असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर समिती स्थापन करण्याची घोषणा केली असून संभाजीराजे यांना विश्वास आहे की लवकरच पुतळा हटवला जाईल.
मात्र शाह यांनी या मुद्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, ज्यामुळे संभाजीराजे नाराज आहेत. अशात संभाजीराजे छत्रपती यांना निमंत्रण न दिल्याने रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नव्या अध्यक्षाची निवड येत्या काळात होणार का अशीही चर्चा सुरू आहे.