Varsha Sanjay Raut | ईडी कार्यालयात हजेरीचे आदेश, संजय राऊतांची पत्नी वर्षा राऊत यांच्या चौकशीकडे लक्ष
माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना आज ईडी कार्यालयात हजेरीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून (PMC Bank Scam) संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस (ED Notice) पाठवली होती. बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास नोटिशीत सांगितलं आहे. त्यामुळे वर्षा राऊत ईडी कार्यालयात हजर राहणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. (Varsha Sanjay Raut ED inquiry Live Update)
वर्षा राऊत यांना नोटीस का?
संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली.
संजय राऊतांचा हल्लाबोल
गेल्या दीड महिन्यापासून ईडी आमच्याकडे पत्रव्यवहार करत आहे. त्यांना काही माहिती, कागदपत्रं हवी आहेत. ती कागदपत्रे आम्ही वेळोवेळी पुरवली. पण गेल्या तीन महिन्यात त्यांनी काहीही शंका व्यक्त केली नाही. भाजपची माकडं कालपासून उड्या मारत आहेत, असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी केला होता.
गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणं, कारवाई करणे म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने आपली भडास काढणं असं लोकांनी गृहित धरलं आहे. सत्तेतील राजकीय पक्षाला, केंद्रातल्या किंवा राजकीय विरोधकांना राजकीय दृष्ट्या संपवता येत नाही. त्यामुळे ईडी, सीबीआय सारखे हत्यारे वापरावी लागतात, असंही राऊत म्हणाले होते.
संजय राऊतांच्या प्रतिज्ञापत्रात काय?
संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाकडे आपल्या संपत्तीच्या विवरणासह प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. 2016 मध्ये संजय राऊत पुन्हा एकदा राज्य सभेवर निवडून गेले. त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाकडे हे संपत्तीचं विवरण दिलं होतं. त्या विवरणानुसार संजय राऊत आणि वर्षा राऊत या दाम्पत्याकडे जवळपास 15 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता होती.
संजय राऊतांची संपत्ती नेमकी किती?
24 मे 2016 च्या प्रतिज्ञापत्रानुसार, संजय राऊत यांच्या हातात 19 हजार 271 रुपयांची रोकड होती. तर पत्नीकडे 38 हजार 288 रुपये हातात होते. मुलगी पूर्वशीकडे 25 हजार तर लहान मुलगी विधीताच्या हातातील रक्कम 500 रुपये दाखवण्यात आले होते. (Varsha Sanjay Raut ED inquiry Live Update)
संजय राऊतांनी त्यावेळी वेगवेगळ्या बँकांमधील डिपॉझिट, मुदत ठेवी, नॉन बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूक दाखवली होती. यामध्येच PNB बँकेचा उल्लेख आढळतो. पत्नीच्या नावे PNB बँकेत जवळपास 5 खात्यांची नोंद विवरणपत्रात आहेत. तर पालघर, अलिबागमध्ये राऊत यांच्या पत्नीच्या नावे जमिनी असल्याची नोंद आहे.
वर्षा राऊत यांच्याकडे जवळपास 23 लाख रुपयांचे दागिने असल्याचं नमूद केलं होतं. यामध्ये 21 लाख 87 हजार 900 रुपयांचे सोन्याचे दागिने तर 1 लाख रुपये किमतीची चांदी असल्याचं म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी हे सर्व उत्पन्न त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोग, ADR या वेबसाईटवर हे तपशील उपलब्ध आहेत. हे उत्पन्न 2016 नुसार आहे. सध्याच्या दरानुसार यामध्ये अर्थातच बदल असेल.
ईडीच्या रडारवर कोण?
पीएमसी बँक आणि एचडीआयएलच्या वाधवान ग्रुपचा समावेश असलेल्या 4 हजार 355 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी ईडी करत आहे. याआधी शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि त्यांची मुलं विहंग-पूर्वेश सरनाईकही ईडीच्या रडारवर आहेत. तर दोनच दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनाही ईडीने समन्स बजावलं होतं.
काय आहे PMC बँक घोटाळा?
पीएमसी बँक खोटे खाते दाखवत एका रियल इस्टेट डेव्हलपरला जवळपास 6500 कोटी रुपये कर्ज देत असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेला 2019 मध्ये मिळाली होती. हा व्यवहार होऊ नये आणि पैसे वाचावे या हेतूने रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर 24 सप्टेंबर 2019 रोजी निर्बंध लादले. हे निर्बंध 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीचा तपास सुरु आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. हे दोघे एचडीआयएल कंपनीचे संचालक आहेत. पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल (HDIL) आणि वाधवान यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जाते.
संबंधित बातम्या :
Varsha Sanjay Raut | वर्षा संजय राऊत यांची ईडी चौकशी का? वाचा सविस्तर
23 लाखाचे दागिने, पालघर, अलिबागमध्ये जमिनी, PNB मध्ये 5 खाती, वर्षा राऊतांची प्रॉपर्टी किती?
(Varsha Sanjay Raut ED inquiry Live Update)