वसईत पुराच्या पाण्यात 14 वर्षांचा मुलगा वाहून गेला
वसईमध्ये पुराच्या पाण्यात 14 वर्षांचा पावन प्रजापती हा मुलगा वाहून गेला. पोलिस प्रशासन पावनचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
वसई : मुंबई उपनगरांसह वसई-विरार (Vasai Virar) भागामध्ये पावसाचा कहर (Mumbai Rain) सुरुच आहे. वसईमध्ये पुराचा पहिला बळी गेल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पुराच्या पाण्यात 14 वर्षांचा मुलगा वाहून गेल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
14 वर्षांचा पावन प्रजापती हा मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेला. वसईच्या हद्दीतील मोरी गावात ही घटना घडली. पावनचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.वसईतील कामन, साराजामोरी, मोरी, नागले या गावांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला आहे.
सलग दुसऱ्या दिवशी मुंबई उपनगरांसह ठाणे, कल्याण, वसई-विरार परिसरात पावसाची बॅटिंग सुरुच आहे. पावसाचा जोर शनिवारी रात्रभर कायम राहिल्याने मुंबईतील काही सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. मुसळधार पाऊस पडल्यामुळे मध्य रेल्वेची लोकल वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे.
रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वसई-विरार दरम्यान लोकल वाहतूक सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ठप्प झाली होती. तर मध्य आणि हार्बर रेल्वे लोकलमार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वसई मिठागरात 400 लोक अडकले
तर दुसरीकडे वसई विरारमध्ये नालासोपाऱ्यात सततच्या पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणी साचले आहे. त्यामुळे विरार पश्चिम विवा कॉलेज रस्ता, नालासोपारा पूर्व, वसई तीळ सातीवली नवजीवन, वालीव गोलानी, वसई मिठाग्रह, आनंद नगर, यासह अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे वसई मिठागर परिसरात 400 लोक अडकले आहेत. तसेच वसईतील ग्रामीण भागातील मळजीपाडा, चांदीप, भाताने, नावसाई, घाटेघर, या गावातील घरात पाणी साचले आहे.
पांडवकडा धबधब्यात चौघी बुडाल्या
नवी मुंबईतील पांडवकडा धबधब्याच्या पाण्यात कालच चौघी विद्यार्थिनी वाहून गेल्या. त्यापैकी तिघींचा मृतदेह सापडला, तर एका विद्यार्थिनीचा शोध सुरु आहे.
चिमुकला दिव्यांश बेपत्ता
मालाडमधील आंबेडकर चौक परिसरात गटारात पडून वाहून गेलेला चिमुकला दिव्यांश सिंह (Divyansh Singh) अद्याप सापडलेला नाही. बुधवार 10 जुलै 2019 रोजी दिव्यांशचे वडील काही कामानिमित्त घराबाहेर गेले असता त्यांच्या मागे दिव्यांशही गेला. वडील रस्त्यावर कुठे दिसले नाहीत म्हणून तो फिरत असतानाच उघडय़ा गटारात पडला.
दिव्यांश कुठे न दिसल्याने जवळच असलेल्या मशिदीबाहेरील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. सीसीटीव्हीमध्ये दिव्यांश गटारात पडल्याचं समजताच पोलीस, पालिका अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधकार्य सुरू केलं होतं.
डॉ. दीपक अमरापूरकर हे दोन वर्षांपूर्वी हे भुयारी गटारात पडून वाहून गेल्यानंतर पालिकेच्या निष्काळजीबाबत प्रचंड टीका झाली. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी उघडी गटारे, झाकणे नसलेली भुयारी गटारद्वारे (मॅनहोल) दिसतात.