किरकोळ बाजारात भाजी विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट, पावसाचे कारण पुढे करत दर वाढवले
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारात भाज्यांच्या किंमतीत थोडेफार चढ-उतार सुरू आहेत.
ठाणे : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारात भाज्यांच्या किंमतीत चढ-उतार सुरू आहेत. मात्र किरकोळ बाजारात ग्राहकांची मोठी लूट सुरू झाली आहे. पावसाचे कारण पुढे करत जवळपास सर्वच भाज्यांचे दर अवाच्या सव्वा वाढविण्यात आले आहे. या दरवाढीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने ग्राहक भरडून निघत आहेत. घाऊक बाजाराच्या तुलनेत किरकोळ बाजारात भाज्यांचे दर किलोमागे 20 ते 20 रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वच भाज्यांच्या किमतींनी शंभरी गाठली आहे. (vegetable sellers Looting consumers in retail market)
मुंबई, ठाणे तसेच उपनगरातील बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक महिनाभरापूर्वी घटली होती. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र होते. काही काळानंतर भाज्यांची आवक स्थिरावल्याने घाऊक बाजारातील दर नियंत्रणात आले आहेत. राज्यातील विविध भागात झालेल्या परतीच्या पावसामुळे भाजी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे तसेच उपनगरांतील भाज्यांची आवक 50 टक्क्यांनी मंदावली आहे. त्यामुळे घाऊक बाजारातही काही प्रमाणात दरवाढ झाली असली तरी किरकोळ विक्रेते मात्र अवाच्या सव्वा दराने भाज्यांची विक्री करु लागले आहेत.
घाऊक भाजी बाजारात 30 ते 35 रुपये किलो दराने मिळणारा कोबी किरकोळ विक्रेते 80 रुपयांना विकत आहेत. 30 ते 65 रुपये किलो या दराने मिळणाऱ्या फ्लॉवर, गवार, शिमला मिरचीच्या दरांनी तर किरकोळीत शंभरी गाठली आहे. एरवीच्या तुलनेत या भाज्यांचे घाऊक बाजारातील दरही चढेच असले तरी किरकोळीत मात्र परतीच्या पावसाचे भांडवल केले जात आहे.
परतीच्या पावसामुळे भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक घटली असून त्यांच्या दरात वाढ झाली आहे. वाढलेल्या दरांमुळे ग्राहकवर्ग नाराज आहे, असे विक्रेते सांगत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, व्यवसाय बंद आहेत, त्यामुळे अनेकांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात अश्या प्रकारे भाज्यांचे भाव वाढल्याने भाजी खावी की नाही हा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
भाज्यांचे दर खालीलप्रमाणे
भाज्या – (घाऊक-होलसेल) : (किरकोळ-रिटेल)
भेंडी – 44 रु. किलो : 80 रु. किलो गवार – 65 रु. किलो : 120 रु.किलो फरसबी – 65 रु. किलो : 120 रु. किलो फ्लॉवर – 30 रु. किलो : 120 रु. किलो कोबी – 34 रु. किलो : 80 रु. किलो टोमॅटो – 35 रु. किलो : 60 रु. किलो वाटाणा – 150 रु. किलो : 200 रु. किलो वांगी – 34 रु. किलो : 100 रु. किलो शिमला मिरची – 50 रु. किलो : 100 रु. किलो
संबंधित बातम्या