मुंबई : राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा आमनेसामने आलीय. मुंबईत भाजप युवा मोर्चानं शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला. मात्र, यावेळी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर माहिम पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी गुन्हा दाखल झाला नाही आणि उद्या परिस्थिती हाताबाहेर गेल्यास पोलीस आणि सरकार जबाबदार असेल, असा इशाराच दरेकर यांनी सरकारला दिलाय. (Praveen Darekar’s warning to CM Uddhav Thackeray)
भाजपच्या महिला कार्यकर्त्यांसोबत जी वर्तणूक केली गेली ती अत्यंत घृणास्पद होती. गुन्हात त्याचा अंतर्भाव केला नाही तर वेळप्रसंगी आम्ही कोर्टात जाऊ. तुम्ही वेळेवर आणि योग्य कारवाई केली नाही आणि त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर केली तर आम्ही जबाबदार नाही, असं दरेकर म्हणाले. हे आंदोलन शिवसेनाभवनावर दगडं मारण्यासाठी नाही, तर राम मंदिराच्या मुद्द्याबाबत होतं. दगडं मारणारा आमचा पक्ष नाही आणि दगडं मारणाऱ्या पक्षानं दगडं मारण्याबाबत बोलू नये, असा टोलाही दरेकर यांनी शिवसेनेला लगावलाय.
शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाबाबत शिवसेनेची गुंडागर्दी सुरु आहे. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार. परंतू याचा अर्थ समोरच्याच्या अंगावर धावून जाणं नाही. अॅक्शनला रिअॅक्शन शांततेनं द्या. अॅक्शनला हाणामारीनं उत्तर मिळणार असेल तर उद्या जी परिस्थिती उद्भवेल त्याला पोलीस आणि मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशाराही दरेकर यांनी दिलाय.
भाजप युवा मोर्चाने पोलिसांना सूचना देऊन आंदोलन केलं होतं. मात्र शिवसैनिकांनी पोलिसांच्या आडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्यावरुन शिवसेनेनं आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली आहे. ज्यावेळी सोनिया आणि वाड्रा आपले देव होतात. त्यावेळी साठे, तेंडुलकर हे शिवसेनेचे शत्रू होतात, अशी घणाघाती टीका आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केलीय. लाथों के भूत बातोंसे नही मानते, यापुढे त्यांना लाथांनीच उत्तर मिळेल, असा इशाराही शेलार यांनी शिवसेनेला दिलाय.
पोलिसांनी निष्पक्षपणे काम करावं अशी अपेक्षा आहे. गुन्हा दाखल केला नाही तर आंदोलन अजून वाढेल, असा इशारा देतानाच पोलिसांनी गुन्हा दाखल करुन असं आश्वासित केल्याचं यावेळी आशिष शेलार यांनी सांगितलं. पण आम्हाला अजूनही कारण कळत नाही की राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेच्या पोटात का दुखत आहे. ‘देखो ये दिवानो ऐसा काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो’, असा टोलाही शेलार यांनी शिवसेनेला लगावलाय.
अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला आहे. भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र शिवसेना भवनापासून 5 किमी अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलं. पोलिसांच्या व्हॅनमधून भाजप कार्यकर्त्यांना घेऊन जात असताना शिवसेना भवनासमोर उपस्थित असलेल्या शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
आंदोलन आणि संभाव्य वाद टळला असं चित्र दिसत असतानाच दुसरीकडे मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यावेळी काही शिवसैनिकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. भाजपच्या काही कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आलीय. तर महिलांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
Praveen Darekar’s warning to CM Uddhav Thackeray