मुंबई : जेलमध्ये असणारे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आधी राज्यसभेसाठी मतदान करता आलं नाही. तर आता विधान परिषदेसाठीही मतदान (Vidhan Parishad Election) करता येणार नाही. कारण कोर्टानं राष्ट्रवादी आणि माहाविकास आघाडीला पुन्हा दणका देत मलिक आणि देशमुखांना मताला परवानगी नाकारली आहे. गेल्या काही दिवसांत मतांना परवानगी मिळावी यासासाठी मलिक आणि देशमुख यांच्याकडून अनेकदा कोर्टाचे उंबरे झिजवण्यात आले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळेच आता हे दोघेही विधान परिषदेच्या मतांना मुकणार आहे. यावरूनच आता भाजप नेत्यांनी पुन्हा महाविकास आघाडीला डिवचलं आहे. तर संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे पुन्हा आरोपांची सरबत्ती केली आहे. यावरून आता वेगळेच राजकीय घमासान सुरू आहे.
यावरूनच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीला टोलेबाजी केली आहे. बुडत्याचा पाय आणखी खोलात गेला आहे. महाविकास आघाडीचा काउन्ट डाऊन सुरू झाला आहे. आमचा 5 व्या जागेवर विजय निश्चित आहे महाविकास आघाडीची 2 मतं कमी झाल्याने आमच्यासाठी दिलासा आहे, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
यावरूनच भाजप नेते आशिष शेलार यांनीही हल्लाबोल चढवला आहे. मा. मुंबई उच्च न्यायालयातून जी माहिती आली आहे, हा भाजपाच्या विजयासाठीचा शुभसंकेत आहे. या निकालानंतर कोटा व त्याची गणिते काय असणार हे पहावे लागेल, पण आता तरी हा भाजपाच्या विजयाचा शुभसंकेत आहेत. अशी प्रतिक्रिया नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यास न्यायालयाने परवानगी नाकारल्याचे वृत्त आल्यानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना आमदार आशिष शेलार यांनी दिली.
मात्र यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून धक्के कोण देतय हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना शिक्षा ठोठावण्यात आलेली नाही, गुन्हा सिद्ध झालेला नाही. त्यांना बेकायदेशररित्या जेलमध्ये डांबून ठेवण्यात आलेले आहे. त्यांना राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी मतदान करण्याचा लोकशाहीने अधिकार दिलेला आहे. संसदीय लोकशाहीला टाळे लावण्याची वेळ आलेली आहे, असे म्हणत राऊतांनी हल्लाबोल चढवला आहे.
विधान परिषदेत फोडाफोडीच्या राजकारणाबाबत बोलताना राऊत म्हणाले, कोणाकडेही अतिरिक्त मते नाहीत. प्रत्येकाला त्यांच्या उमेदवारासाठी लागणारी मते आहेत. या निवडणुकीत कौशल्य काय आहे हे दाखवून देऊ असं स्वतः अजित पवार म्हणाले आहेत, याची आठवणही त्यांनी करून दिली आहे. तसेच भाजपवाल्यांनी जादू टोण्याचं दुकान उघडलंय. मात्र लिंबू मिरची घेऊन बसले असले तरी काही होणार नाही. असे चमत्कार खूप पाहिलेत. असेही संजय राऊत म्हणाले.