मुंबई : मागचे सरकार नालायक होते त्यांनी एकाही समाजाला न्याय दिला नाही. मराठा समाजाकडे (Maratha community) दुर्लक्ष केले. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण त्यांनी घालवले. सगळ्या समाजाच्या लोकांवर अन्याय करण्याचे काम त्यांनी केले, अशी टीका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केली आहे. मेटे यांचा जन्मदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी नव्या सरकारचे स्वागत करत महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीका केली. गेल्या अडीच वर्षात केवळ भ्रष्टाचार गेल्या सरकारने केला. तर अडीच वर्ष तुम्ही भेटला नाहीत, रात्री वेशांतर करून तुम्ही रणनीती करत होतात. पण शेवटी तुम्ही स्वतःचे सरकार आणून दाखवले. आता आपल्याला कोणी न्याय देणारे असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत, अशी स्तुतीसुमने त्यांनी फडणवीसांवर उधळली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांचा आम्हाला आदर आहे. पण आमच्या मनात तुम्हीच मुख्यमंत्री आहात. मी या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये अनेक वेळा मोर्चे काढले, पण उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अशोक चव्हाण यांनी लक्ष दिले नाही. माझी विनंती आहे, की शिंदे साहेब आणि तुम्ही मिळून राज्य मागासवर्गीय आयोगाला पत्र लिहा, निधी आम्ही गोळा करू. तुमच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. तुम्ही शब्द दिला होता सरकार मध्ये घेण्याचा, ते जरी पाळले नसले, तरी आम्ही तुमच्या सोबत असू, असा शब्द मेटे यांनी फडणवीस यांना दिला.
2014मध्ये सत्तेमधून मी विरोधी पक्षात गेलो. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने तुम्ही सत्ता चालवता. पण मागच्या अडीच वर्षात 5 मिनिटेसुद्धा शिवाजी महाराज यांच्या समुद्रातील पुतळ्याच्या आढावा बैठकीला वेळ दिले नाही, असा आरोप त्यांनी शिवसेनेवर केला. गेल्या अनेक वर्षांमध्ये मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार कोणीही केला नाही, असा घणाघात त्यांनी केला.