कुणाच्या किती जागा निवडून येणार?, कोण मुख्यमंत्री होणार?; विनोद तावडेंनी अंदाज सांगितला
Vinod Tawade on Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीत कोण किती जागा जिंकणार? कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार? यावर भाजप नेते विनोद तावडे यांनी भाष्य केलं आहे. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत विनोद तावडे यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलंय. वाचा...
राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. सगळेच पक्ष जोमाने प्रचार करत आहेत. अशात कोणत्या पक्षाचे किती उमेदवार जिंकणार? कोण सत्तेत असणार? कोण मुख्यमंत्री होणार? याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. भाजप नेते विनोद तावडे यांनी टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत यावर भाष्य केलं. उद्धव ठाकरेंना लोकसभेत सहानुभूती मिळाली हे चूक आहे. त्यांनी २०१९ला गद्दारी केली हे लोकांच्या मनात पक्कं आहे. यंदा भाजप ९५ ते ११० जागांपर्यंत जाईल. शिवसेना शिंदे गट ४५ ते ५५ जागा जिंकेल. राष्ट्रवादी अजित पवार गट २५ ते ३० जागा जिंकेल. तर संपर्ण महायुती मिळून १६५ ते १७० पर्यंत जाऊ, असं विनोद तावडे म्हणालेत.
मुख्यमंत्री कोण असणार?
जर महायुतीची सत्ता आली तर कोण मुख्यमंत्री होणार? या प्रश्नावर तावडेंनी उत्तर दिलं. मुख्यमंत्रिपदाची चर्चा निवडणुकीनंतर करू असं पक्षाने ठरवलं आहे. संख्याबळावर मुख्यमंत्री ठरणार नाही. निवडणुकीनंतर बसवून ठरवू. ज्याचे आमदार जास्त तो होईल किंवा बिहारमध्ये आम्ही नितीश कुमार केले. आमचे आमदार जास्त पण नितीश कुमार झाले. पण त्या त्यावेळच्या राजकीय परिस्थितीवर लक्षात घेऊन करावं लागेल. महाराष्ट्राच्या हिताचं पाहून निर्णय घ्यावा लागेल, असं विनोद तावडे म्हणालेत.
हरियाणात जे घडलं ते विधानसभेत घडेल. लोकसभेत आम्हाला जागा कमी आल्या. फार कमी होत्या. आता एमआयएम, वंचित, समाजवादी पार्टी हे काही मते घेणार आहे. पण महायुतीत अशी मतांची विभागणी होणार नाही. त्यामुळे आमच्या जागा वाढणार आहे. अब की पार ४०० झालं. मोदी भक्तांनी मतदान केलं नाही. मोदी येणारच आहे, असं म्हणून मतदान झालं नाही. त्यामुळे चार पाच टक्के मतदान कमी झालं. त्याचा फटका बसला, असं तावडे म्हणालेत.
उद्धव ठाकरेंवर निशाणा
विनोद तावडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली असं म्हटलं. जनतेने २०१९मध्ये महायुतीला जनादेश दिला. त्याच्या विरोधात जाऊन उद्धव ठाकरे यांनी सरकार बनवलं ही गद्दारी आहे. काँग्रेस सोबत जाणार नाही, असं बाळासाहेब म्हणायचे. उद्धव ठाकरे यांनी तेच केलं. पुढचे अडीच वर्ष होतं ना. पहिले अडीच वर्ष राहायचं. नंतर अडीच वर्षाने मुख्यमंत्रीपद दिलं नसतं तर जायचं होतं. पण तुमचं आधीच ठरलं होतं. त्यामुळे ते गेले, असं विनोद तावडे म्हणालेत.