आम्ही गद्दारी केली नाही, हा गदर आहे, गदर म्हणजे…; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार
आम्ही बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. त्यांच्या विचारांचे पाईक आहोत.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर पटलवार केला. एकनाथ शिंदे म्हणाले, तीन महिन्यात गद्दार आणि खोके. तिसरा शब्दच नाही. गद्दारी झाली. पण 2019 ला गद्दारी झाली. निवडणुकीनंतर गद्दारी झाली. बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली. हिंदुत्वाशी गद्दारी केली. जनतेशी बेईमानी केली. आम्ही गद्दारी केली नाही. हा गदर आहे. गदर म्हणजे क्रांती. गदर म्हणजे उठाव. असा पटलवार शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, आम्ही बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. त्यांच्या विचारांचे पाईक आहोत. तुम्ही म्हणता बाप चोरणारी टोळी निर्माण झाली. बाप चोरणारे म्हणता. तुम्ही तर बापाचे विचारच विकले. तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्याला ती टोळी म्हणायचे. एक मर्यादा असते सहन करायची.
तुम्ही पाप केलंय. शिवतीर्थावर गुडगे टेका. 40 वर्षे खस्ता खाल्यात शिवसैनिकांनी. खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख हे आता मंत्री झाले. पोलीस केस घेतल्या. तुरुंगात गेले. वेड्यासारखं काम केलं. यांना तुम्ही गद्दार म्हणता. अडीच वर्षे गप्प का बसलं. आघाडी चुकीची आहे, असं आमदार मला सांगत होते. महाराष्ट्राचा खड्ड्यात घालणारी अशी ती महाविकास आघाडी होती.
तुम्ही बाळासाहेबांचे विचार गुंडाळले तेव्हा मीच आमदारांना भेटायचो. आमदारांना निधी मिळत नव्हता. राष्ट्रवादी, काँग्रेसचे हरलेल्या लोकांना निधी दिला जात होता. शिवसेनेचं खच्चीकरण करण्याच काम सुरू होतं. पुढचा आमदार राष्ट्रवादीचा, पुढचा आमदार काँग्रेसचा, असं ते म्हणत होते. मी चार-पाच वेळा सांगितलं. आपल्याला चूक दुरुस्त करावी लागेल. तेव्हा तुम्ही म्हणाले, आमदारांना शरम वाटतं नाही. लाच वाटतं नाही.
पराभूत आमदाराला निधी दिला जात होता. टोकाचं सांगितलं. निर्वाणीचं सांगितलं. नंतर आम्ही हा उठाव केला. 40 आमदार, 12 खासदारांनी का सोडलं. शेकडो पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख मला येऊन का भेटले. तुम्हाला यांनी का सोडलं.
राज ठाकरे, नारायण राणे हे सोडून गेले. हे सगळे चुकीचं कसे? तुम्ही आत्मपरीक्षण करायला हवं. तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे पूर्ण करायची होती. शिवसेनेचं पानीपत उघड्या डोळ्यानं पाहत होतात, अशी टीकाही एकनाथ शिंदे यांनी केली.