जोगेश्वरी-विलेपार्लेदरम्यान कार बंद पडली, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतुकीचे तीन तेरा
सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. सध्या या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत आहे.
Western Express Highway Traffic Jam : राज्याची राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. मुंबईत सध्या वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. यामुळे असंख्य मुंबईकरांना कामावर जाताना आणि कामावरुन परतताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर एक कार बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर कार बंद पडल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील जोगेश्वरी आणि विलेपार्ले या मार्गावर एक कार बंद पडली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. सध्या या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
तर दुसरीकडे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र गुजरात सीमेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे गुजरात आणि मुंबईकडील दोन्हीही मार्गांवर वाहतूक कोंडी झाली. सध्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 3 ते 4 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसत आहे. यामुळे मुंबईहून गुजरातकडे जाणारी वाहतूक आणि गुजरातहून मुंबईकडे जाणारी वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत.
अच्छाड येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. सिमेंट टॉपिंगच्या कामामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी मोठे-मोठे खड्डे झाल्याने वाहन चालकांना नाहक त्रास होताना दिसत आहे.