Raj Thackeray | “नारायण राणे बाहेर गेलेच नसते, पण..”, राज ठाकरेंनी सांगितलं तेव्हा नेमकं काय घडलं?
मनसे राज ठाकरे यांनी काही जुन्या विषयांना हात घालत पडद्यामागे काय घडलं हे सांगितलं. राज ठाकरे यांनी नारायण राणे शिवसेना सोडण्यामागे काय झालं? हे जाहीरपणे सभेत सांगितलं.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडवा सभेत तोफ धडाडली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर आपलं रोखठोक मत मांडलं. इतकंच काय तर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या सध्याच्या स्थितीवरही बोट ठेवलं. शिवसेना कशी फुटत होती याबाबत राज ठाकरे यांनी स्पष्टपणे जाहीर सभेत सांगितलं. यावेळी नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये जाणार नव्हते. मात्र त्यावेळी नेमकं काय झालं? हे राज ठाकरेंनी जाहीरपणे बोलून दाखवलं.
“नारायण राणे बाहेर गेलेच नसते. मी साहेबांशी बोलतो जाऊ नका. मला बोलले बोला तुम्ही साहेबांशी. मी बाळासाहेबांना फोन केला. त्यांची इच्छा नाहीय. जाऊ देऊ नका. मला म्हणाले, लगेच घरी घेऊन ये. मी नारायणरावांना फोन केला. लगेच या आपल्याला साहेबांकडे जायचंय. ते तिकडून निघाले आणि मला बाळासाहेबांचा फोन आला. अरे नको बोलवूस.”, असं सांगत राज ठाकरे यांनी पुढचा किस्सा सांगितला.
“फोनवर बोलताना मला मागून आवाज येत होता. काही नाही. नाईलाजास्तव मला सांगावं लागलं की, येऊ नका. ज्याप्रकारे लोकांना बाहेर काढण्याचं राजकारण चालू होतं त्याचा शेवट हा. त्यांचं राजकारण त्यांना लख लाभो.”, असं नारायण राणेंबाबत राज ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितलं.
“जे नाव (शिवसेना) मी पाहत आलो ते टांगताना दिसलं तेव्हा त्रास झाला. मी शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा पक्ष काढायचा हे मनातही नव्हतं. बाळासाहेबांसमोर पक्ष काढायचा? या अशा परिस्थितीत लोक माझ्याकडे आले आणि म्हणाले महाराष्ट्र फिरा. मी महाराष्ट्र फिरलो आणि प्रतिसाद पाहिला.”, असंही राज ठाकरे यांनी पुढे सांगितलं.