बदलापूरचा होम प्लॅटफॉर्म केव्हा पूर्ण होणार?, प्रवाशांची होतेय अडचण
बदलापूर रेल्वे स्थानकातील गर्दीचे विभाजन करणारा बहुप्रतिक्षित होम प्लॅटफॉर्म ऑक्टोबर अखेरीस प्रवाशांच्या सेवेत येणे अपेक्षित होते. मात्र डिसेंबर महिना सुरू झाला तरी या प्लॅटफॉर्मच काम पूर्ण झालेले नाहीये. त्यामुळे प्रवाशांना सुरू असलेल्या कामांमधून वाट काढतच या फलाटाचा वापर करावा लागतो आहे.
मुंबई | 15 डिसेंबर 2023 : बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे काम प्रचंड रखडले आहे. या होम प्लॅटफॉर्ममुळे गर्दीचे विभाजन होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या प्लॅटफॉर्मचे काम ऑक्टोबर अखेरीस पूर्ण होऊन तो प्रवाशांच्या सेवेत येणे अपेक्षित होते. परंतू डिसेंबर महिना संपायला आला तरी प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाले नसल्याने प्रवाशांची अडचण होत आहे. प्रवाशांना सुरु असलेल्या कामामधून वाट काढावी लागत असल्याने हे काम केव्हा पूर्ण होणार असा सवाल प्रवाशी संघटनांनी केला आहे.
एकेकाळी स्वस्तात घर मिळायची म्हणून बदलापूर येथील निवासी प्रकल्पाची वाढ झाली. गेल्या काही वर्षांत बदलापूरची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्म बांधण्याचे काम गेल्यावर्षी सुरु करण्यात आले. सर्वाधिक गर्दी होणाऱ्या फलाट क्रमांक 1 आणि 2 वरील गर्दीचे विभाजन करण्यासाठी पश्चिम दिशेला होम फलाट बांधण्यास सुरुवात झाली होती. यासाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लोकसभा निवडणूकीच्या पूर्वी 2019 मध्ये ऑनलाईन पद्धतीने या होम फलाटाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र भूमिपूजन होऊनही प्रत्यक्षात जागेचा प्रत्यक्ष ताबा न मिळाल्याने या फलाटाचे काम उशीराने सुरु झाले.
जागा मिळण्यास झाला उशीर
बदलापूर स्थानकातील होम फलाटाचे काम सुरु करण्यात अनेक अडचणी आल्या. येथील स्कायवॉकच्या खाली असलेले रिक्षा थांबे, दुकाने यामुळे जागेची अडचण निर्माण झाली होती. या जागेचा ताबा मिळविण्यासाठी मध्य रेल्वेला खूप प्रयत्न करावा लागला. गेल्या काही महिन्यांपासून होम प्लॅटफॉर्मच्या कामाला वेग आला आहे. उपलब्ध जागेत फलाटाचे काम सुरू करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी संपूर्ण जागा उपलब्ध झाल्यामुळे आता होम फलाटाचे काम सुरू झाले. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने या प्लॅटफॉर्मचे काम ऑक्टोबर 2023 अखेर पूर्ण होईल अशी माहिती संबंधित रेल्वे, कोळशा आणि खाण राज्यमंत्री यांच्या कार्यालयाला दिली होती. त्यामुळे प्लॅटफॉर्म काम वेगाने मार्गी लागेल अशी आशा होती.
नवीन वर्षांतच होणार काम
मात्र डिसेंबर महिना संपत आला तरी होम फलाटाचे काम पूर्ण झालेले नाही. अजूनही फलाटावर लाद्या बसवणे, संरक्षक भिंती उभारणे, छप्पर बसवणे, पायऱ्या तयार करणे अशी कामे सुरू आहेत. त्यामुळे या फलाटाचे काम मार्गी लागण्यासाठी 2024 वर्ष उजाडण्याची शक्यता आहे. परिणामी अपूर्ण होम प्लॅटफॉर्मवरूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या होम प्लॅटफॉर्मला अखेरचा मुहूर्त कधी मिळणार असा प्रश्न प्रवासी वर्ग करत आहेत.