अजित पवार VS शरद पवार, व्हीप नेमका कुणाचा मानायचा? सूत्रांकडून आतली बातमी
विधी मंडळाचं आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. या पावसाळी अधिवेशनात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणता गटाचा व्हीप आमदारांसाठी लागू होईल? याबाबतचा पेच निर्माण झाला आहे. याबाबत सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मुंबई | 17 जुलै 2023 : विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालीय. अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी आज विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांवर राज्यात दुबार पेरणीची वेळ आली तर सरकार निश्चित मदत करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान, या वर्षाचं पावसाळी अधिवेशन महत्त्वाचं आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. राष्ट्रवादी पक्ष दोन गटात विभागला गेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी पक्ष सत्तेत सहभागी आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी पक्ष विरोधात आहेत. असं असताना आता सभागृहात व्हीप नेमका कोणता गटाचा मानला जाईल? असा प्रश्न निर्माण झालाय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ असताना मंत्री अनिल पाटील हे पक्षाचे विधानसभेतील प्रतोद होते. अनिल पाटील हे अजित पवार यांच्या गटासोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी अनिल पाटील यांनाच प्रतोदपदी कायम ठेवलं आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या गटाने आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतोदपदी निवड केली आहे. विशेष म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार नेमकं कुणाचं ऐकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. असं असताना सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता दोन प्रतोद दिसणार?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणता गटाचा व्हीप मानायचा, याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेणार आहेत. पण त्याआधी सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीतही दोन प्रतोद दिसणार आहेत. यंदाच्या अधिवेशनात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे प्रतोद व्हीप बजावणार आहेत.
राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर खरा पक्ष कोणाचा? हा प्रश्न अनुत्तरित आहे. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय होईपर्यंत दोन्ही गटाचे व्हीप अस्तित्वात राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गावखेड्यापासून शहरापर्यंत राष्ट्रवादीचा पाठिंबा कोणत्या गटाला? हे तपासावे लागणार असल्याने राष्ट्रवादीबाबतही प्रदीर्घ काळ सुनावणी चालण्याची चिन्हे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही गटाचे आमदार वेगवेगळे बसले
पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. सत्ताधाऱ्यांकडून शोक प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर आज दिवसभरासाठी विधी मंडळाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाबाबत उत्सुकता होती. कोणत्या गटाच्या बाजूने किती आमदार आहेत हे आज स्पष्ट होणार असल्याचं मानलं जात होतं. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या गटाचे आमदार वेगळ्या बाजूला होते. तर शरद पवार गटाचे आमदार वेगळ्या बाजूला होते. पण शरद पवार यांच्या गटातील फक्त 8 आमदार आज सभागृहात बघायला मिळाले. त्यामुळे शरद पवार यांच्या पाठीमागे नेमके किती आमदार आहेत? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.