मुंबईतील कोणत्या भागातील हवा सर्वाधिक खराब?; मुख्यमंत्र्यांनीही केली होती पाहणी
जगातील सर्वाधिक प्रदुषित शहरात दिल्लीनंतर दक्षिण आशियातील मुंबई शहराचा क्रमांक लागत आहे. यंदा तर दिवाळी सुरु होण्यापूर्वीच ऑक्टोबर महिन्यात प्रदूषणाने सर्वाच्च पातळी गाठल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईतील प्रदूषणाच्या वाढत्या प्रमाणामुळे मुंबईकरांना श्वसनाचे विकारांचा सामना करावा लागत आहे.
निवृत्ती बाबर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : देशाची आर्थिक राजधानी मुंबई देखील राजकीय राजधानी दिल्लीच्या पावलावर पाऊल ठेवत प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चालली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे मुंबईत देखील दिल्लीप्रमाणे डिसेंबर महिन्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याच्या पालिकेच्या हालचाली सुरु आहेत. त्यातच मुंबई महानगर पालिकेने बांधकाम सुरु असलेल्या साईटवर धुळ निर्माण होऊ नये यासाठी उपययोजनांची जंत्री जारी केली. मुंबई महानगर पालिकेच्या या उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी मुंबईच्या विविध भागात पाहणी करुन घेतला आहे. या अहवालात मुख्यमंत्र्यांना काय आढळलं ते पाहूयात
जगातील सर्वाधिक प्रदुषित शहरात दिल्लीनंतर दक्षिण आशियातील मुंबई शहराचा क्रमांक लागत आहे. यंदा तर दिवाळी सुरु होण्यापूर्वीच ऑक्टोबर महिन्यात प्रदूषणाने सर्वाच्च पातळी गाठल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईतील प्रदूषणाच्या वाढत्या प्रमाणामुळे मुंबईकरांना श्वसनाचा त्रास, घशाचे आजार, खोकला आणि डोळे चुरचुरणे अशा तक्रारी ऑक्टोबर महिन्यांपासूनच सुरु झाल्या होत्या. त्यामुळे नागरिकांसाठी कोणतीही आरोग्यविषयक माहिती जारी न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगर पालिकेला चांगलेच धारेवर धरले होते. त्यामुळे आता मुंबई महानगर पालिकेने रस्ते धूणे, तसेच हवेत जलतुषारांचा छीडकारा करणारी यंत्रे फिरविणे असे उपाय योजन्यास प्रारंभ केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळी मुंबईची प्रभात फेरी करीत पालिकेच्या सुरु असलेल्या कामाची जातीने पाहणी केली. पेडर रोड, वांद्रे येथील कलानगर मुख्यमंत्र्यांनी आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर सांताक्रुझ, जुहू परिसरातील स्वच्छता आणि प्रदूषण आवरण्यासाठी केलेल्या उपाय योजनांचा मुख्यमंत्र्यांनी आढवा घेतला.या वेळी केलेल्या पाहणीत मुख्यमंत्र्यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कौतूक केले. दिवाळीनंतर पालिकेकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजणांमुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होत असल्याचे म्हटले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वांद्रे कलानगरातून पाहणी दौरा सुरु केला. या पाहणीत बीकेसी कलानगर येथील हवेची गुणवत्ता ‘जैसे थे’ होती. मुंबईतील बीकेसी कलानगर वगळता इतर भागात हवा गुणवत्ता समाधानकारक श्रेणीत होती. मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारणेच्या कार्यक्रमामुळे हवेची गुणवत्ता सुधारल्याचे यावेळी निदर्शनास आले आहे. मुंबईतील हवेचा एअर क्वालिटी इंडेक्स खालील प्रमाणे आहे.
एकूण मुंबई – 109 AQI
कुलाबा – 103
भांडुप – 120
मालाड – 124
माझगाव – 150
वरळी – 90
बोरिवली – 126
बीकेसी – 202
चेंबूर – 115