“…तर मग मोदींची शिवसेना म्हणा!;” सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाला सुनावलं
दाओसमध्ये आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार केल्याचं म्हंटलं जातं. मग, या कंपन्या महाराष्ट्रातल्या कशा, याची उत्तर द्यावी. टोलवाटोलवी करतात. त्यावर उत्तरं द्यावी.
नंदकिशोर गावडे, प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादीच्या नादाला लागून उद्धव ठाकरे हे शिवसेना संपवायला निघाले असल्याची टीका दीपक केसरकर यांनी केली. यावर बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. बिचारे केसरकर हे मोदीजींच्या नादाला लागून अख्या शिवसेनेच्या मुळावर उठलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधानांसमोरील भाषणात ते म्हणाले होते की, लोकं विचारतात तेव्हा आम्ही मोदींचे असल्याचं सांगतो. तुम्ही मोदींचे लोकं असाल तर मोदींची शिवसेना म्हणा ना. तुम्हाला मोदी यांच्या नावाची गरज पडते तर, बाळासाहेबांची शिवसेना कशाला म्हणता? असा सवालही सुषमा अंधारे यांनी विचारला.दीपक केसरकर यांनी आत्मपरीक्षण करावं, असा सल्लाही त्यांनी दिला.
सत्तेसाठी कोण फिरलं. सुरतला कोण गेले. गुवाहाटीला कोण गेले. उद्धव ठाकरे तर इथचं होते ना. अख्खी भारत भ्रमंती कोणी केली. ती सत्तेसाठीचं केली ना, अशीही टीका सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर केली.
दाओसमध्ये आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार केल्याचं म्हंटलं जातं. मग, या कंपन्या महाराष्ट्रातल्या कशा, याची उत्तर द्यावी. टोलवाटोलवी करतात. त्यावर उत्तरं द्यावी. मुख्य मुद्यावरून इतरत्र वळविण्याचा प्रयत्न करू नये, असा घणाघातही सुषमा अंधारे यांनी केला. लोकांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांवर बोललं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
औरंगजेब हा दयाळू होता, असं विधान अबू आझमी यांनी केलं. त्यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, काय बोलायचं हे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलावं. कारण मध्यंतरी त्यांनी औरंगजेबजी म्हंटलं होतं. औरंगजेबजी असं आदरानं बोलणाऱ्या बावनकुळे यांनी यावर बोललं पाहिजे, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, सन्मान महापुरुषांचा आवाज महाराष्ट्राचा अशा आशयाची सन्मान यात्रा होणार आहेत. या परिषदांमधल्या काही सभांना मी महाविकास आघाडीचा भाग म्हणून तसेच राज्याची नागरिक म्हणून सहभागी होणार आहे.