Amruta Fadnavis : आधी मैत्री करून विश्वास जिंकला, नंतर एक कोटीच्या लाचेची ऑफर; कोण आहे अनिक्षा जयसिंघानी?
अमृता फडणवीस यांना एक कोटीच्या लाचेची ऑफर देणाऱ्या अनिक्षा जयसिंघानी या तरुणीला काल पोलिसांनी अटक केली आहे. अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचाही तिच्यावर आरोप आहे.
मुंबई : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एका गुन्हेगारी प्रकरणात मदत करण्यासाठी थेट एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनिक्षा जयसिंघानी या फॅशन डिझायनर महिलेने त्यांना लाच देण्याची ऑफर दिली. वारंवार लाच देण्याचा प्रयत्न झाल्याने अखेर वैतागून अमृता यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनिक्षा जयसिंघांनी हिला अटक केली आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. आधी मैत्री केली. विश्वास संपादन केला. त्यानंतर थेट अमृता फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणारी अनिक्षा सिंघानी कोण आहे? जाणून घ्या तिच्याबद्दल…
अनिक्षा जयसिंघानी ही सट्टेबाज अनिल जयसिंघानी याची मुलगी आहे. अनिक्षा ही पेशाने फॅशन डिझायनर आहे. तिने इंग्रजी साहित्यातून एमए केलं आहे. हरीश स्कूल ऑफ लॉमधून ती कायद्याची पदवी घेत आहे. अनिक्षा ही उल्हासनगरमध्ये राहते. तिचे वडील अनिल जयसिंघानी हे फरार आरोपी आहेत. अनिल जयसिंघानी विरोधात महाराष्ट्र, गोवा आणि आसामममध्ये सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणे, फसवणूक करणअयाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सट्टेबाजीच्या अनेक प्रकरणातही तो होता. त्याची एक टोळीही आहे.
काय आहे प्रकरण?
अनिक्षाने 2015-16च्या दरम्यान अमृता फडणवीस यांच्याशी ओळख केली होती. त्यानंतर ती अचानक गायब झाली. पुन्हा 2021मध्ये ती अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आली. यावेळी तिने आपण फॅशन डिझायनर असल्याचं अमृता फडणवीस यांना सांगितलं. तसेच जगातील 50 पॉवर फूल महिलांमध्ये आपला समावेश असल्याचंही सांगितलं. आई गेल्यानंतर घराचा सर्व खर्च मीच बघते. माझ्या आईवर मी पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं तुम्ही प्रकाशन करावं असं सांगून तिने घरगुती सोहळ्यात अमृता फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाश करून घेतलं. विश्वास संपादन करण्यासाठी तिने या गोष्टी घडवून आणल्या.
त्यानंतर तिने अमृता फडणवीस यांना आपण डिझाइन केलेले कपडे आणि ज्वेलरी इव्हेंटमध्ये घालण्याची विनंती केली. त्यानुसार ती प्रत्येक इव्हेंटसाठी अमृता फडणवीस यांना कपडे आणि ज्वेलरी द्यायची. असं करत करत ती अमृता यांच्या आणखीनच जवळ गेली. त्यानंतर तिने एक दिवस हळूच अमृता फडणवीस यांच्याकडे तिच्या वडिलांचा विषय काढला. माझ्या वडिलांना खोट्या गुन्ह्यात अडकवले गेले आहे. त्यांना त्यातून सोडवा अशी विनंती तिने केली. त्यावर अमृता यांनी एक निवेदन दे, जे कायदेशीर आणि योग्य असेल ते केलं जाईल असं सांगितलं.
त्यानंतर तिने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांच्या लाचेची ऑफरही दिली. तसेच बुकींवर धाडी मारून पैसे कमावण्याचा आपला धंदा असून तुम्ही थोडी मदत केली तर भरपूर पैसे कमवता येईल, असं सांगितलं. ती वारंवार अमृता फडणवीस यांना फोन करायची. मसेज करायची. व्हिडीओ पाठवायची. नंतर तिने अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्नही केला. त्यामुळे अखेर अमृता यांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी काल तिच्या मुसक्या आवळल्या.