मुंबई | 14 जानेवारी 2024 : राहुल गांधी यांच्या न्याय यात्रा सुरु होण्यापूर्वीच माजी खासदार मिलिंद देवरा यांनी राजीनामा देण्याचा मुहूर्त गाठला. गेल्या 55 वर्षांपासून देवरा कुटुंबिय काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखल्या जातात. दक्षिण मुंबई मतदार संघातून उमेदवारी मिळत नसल्याचे लक्षात येताच मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. राजकीय अंदाजानुसार, देवरा लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात जाऊ शकतात. यापूर्वी त्यांनी काँग्रेसचा राजीनाम देण्याची आणि दुसऱ्या पक्षात जाण्याच्या वृत्ताचे खंडण केले होते. या सर्व अफवा असल्याचा दावा केला होता.
का सोडली काँग्रेस
मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडण्यामागे इंडिया आघाडी कारणीभूत असल्याचा तर्क देण्यात येत आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास ते इच्छुक आहेत. पण या जागेवर उद्धव ठाकरे गटाचा दावा आहे. त्यामुळे देवरा यांना संधी नव्हती. त्यामुळेच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यांना गेल्या दोन निवडणूकीत पराभावाचा सामना करावा लागला आहे.
कोण आहेत मिलिंद देवरा
- मिलिंद देवरा यांचा जन्म 4 डिसेंबर 1976 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील मुरली देवरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते तर आई हेमा देवरा गृहिणी होत्या. मिलिंद देवरा हे वडिलांप्रमाणेच काँग्रेस पक्षात सक्रिय होते. दक्षिण मुंबई या व्हीआयपी सह श्रमिक वर्गाचे प्रतिनिधीत्व त्यांनी केले. ते टेक्नोसॅव्ही आणि धर्मनिरपेक्ष म्हणून ओळखले जातात.
- मिलिंद देवरा उच्चशिक्षित राजकीय नेते आहेत. अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठाचे ते पदवीधर आहेत. 9 नोव्हेंबर 2008 रोजी त्यांनी चित्रपट निर्माता मनमोहन शेट्टी यांची मुलगी पूजा शेट्टी हिच्याशी लग्न केले. त्यांची पत्नी वॉक वॉटर मीडिया या चित्रपट निर्माता कंपनीची व्यवस्थापकीय संचालक आहे.
- पहिल्यांदा 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. 5 ऑगस्ट 2004 रोजी त्यांना संरक्षण मंत्रालय समितीचे सदस्य करण्यात आले. 7 ऑगस्ट 2006 रोजी ते केंद्रीय शहर विकास समितीचे सदस्य झाले. 2009 मध्ये ते पुन्हा लोकसभेत पोहचले. त्यांनी अनेक पदांची जबाबदारी संभाळली आहे. ते क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि मुंबई जिमखान्याचे सदस्य आहेत. नुकतीच काँग्रेस वर्किंग कमिटी स्थापन झाली. त्यात अध्यक्ष मलिक्कार्जून खरगे यांनी त्यांना संयुक्त कोषाध्यक्ष ही जबाबदारी सोपवली होती.