इंदिरा गांधींची भेट घेणारा करीम लाला कोण होता?
शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे संपादक आणि खासदार संजय राउत यांनी मुंबईच्या अंडरवर्ल्डचा डॉन करीम लालाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतल्याचं विधान केलं (Underworld don Karim Lala).
मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे संपादक आणि खासदार संजय राउत यांनी मुंबईच्या अंडरवर्ल्डचा डॉन करीम लालाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतल्याचं विधान केलं (Underworld don Karim Lala). त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग आला. भाजपनं इंदिरा गांधी यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करत काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्यानंतर काँग्रेसने देखील याबाबत नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली (Underworld don Karim Lala). यानंतर संजय राऊत यांनीही आपलं वक्तव्य मागं घेतलं. यानिमित्ताने अनेकजणांना करीम लाला कोण आहे याविषयी प्रश्न पडलाय.
करीम लाला पठाण समाजाचा मोठा नेता होता. त्याचं खरं नाव अब्दुल करीम शेर खान होतं. 1911 रोजी अफगानिस्तानमध्ये कुनार प्रांतातील संपन्न व्यापारी कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. मोठं यश मिळवण्याच्या इच्छेने तो वयाच्या 21 व्या वर्षी भारतात आला. करीम लाला कुनारमधून पाकिस्तानच्या पेशावरमार्गे मुंबईत पोहचला.
कुख्यात डॉन मिर्जा हाजी मस्तानचा खास मित्र
मुंबईमध्ये करीम लालाची मोठी दहशत होती. मुंबईच्या अंडरवर्ल्डचा पहिला डॉन मानल्या जाणाऱ्या मिर्जा हाजी मस्तानीशी करीमची खास मैत्री होती. त्या दोघांच्या मैत्रीची मुंबईतही चांगलीच चर्चा होती. मुंबईमध्ये तस्करीसह अनेक बेकायदेशीर व्यवसायांमध्ये त्याचा सहभाग होता. हिरे आणि इतर मौल्यवान दागिन्यांच्या तस्करीपासून त्याने सुरुवात केली. यात नफा झाल्यावर त्याने मुंबईत अनेक ठिकाणी दारू आणि जुगारांचे अड्डे सुरु केले. 1940 पर्यंत त्याने बेकायदेशी धंद्यांमध्ये चांगलीच पकड कमावली.
करीमच्या दरबारात घटोस्फोट सोडून सर्व प्रश्नांची सोडवणूक
करीम दररोज सायंकाळी आपल्या घरी दरबार भरवायचा. येथे जमलेल्यांच्या अनेक प्रश्नांवर तो तोडगा काढायचा. मात्र, घटोस्फोटाबाबत त्याने कधीही निवाडा केला नाही. यावर काहीही उपाय निघू शकत नाही, असं तो बोलायचा. त्याच्या या दरबाराने त्याला चांगलीच प्रसिद्धी दिली. करीम लालाचे बॉलिवुडशीही जवळचे संबंध असल्याचं सांगितलं जातं.
अभिनेत्री हेलन देखील एकदा मदतीसाठी करीम लालाकडे आल्याचं सांगितलं जातं. हेलनचा मित्र पी. एन. अरोरा त्यांची सर्व कमाई घेऊन फरार झाला. मागणी करुनही त्याने हेलनला पैसे परत देण्यास नकार दिला. हताश झालेली हेलन सुपरस्टार दिलीप कुमार यांच्यामार्फत करीम लाला यांच्याकडे गेली. दिलीप कुमार यांनी हेलनला करीम लालासाठी एक पत्रही लिहून दिलं होतं. यानंतर करीम लालाने यात मध्यस्थी केली आणि हेलनचे पैसे पुन्हा मिळाले.
दाऊद इब्राहिमला सार्वजनिकपणे मारहाण
मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये आजही करीम लालाने दाऊद इब्राहिमला केलेल्या मारहाणीची चर्चा होते. दाऊद इब्राहिमने करीम लालाच्या तस्करीच्या व्यापारात हस्तक्षेप केला. त्यानंतर करीमने संतापून दाऊदला मारहाण केली. यात दाऊद चांगलाच जखमी झाला. यानंतर दोघांमध्ये चांगलंच शत्रूत्व तयार झालं.
दाऊदला करीम लालाच्या शत्रूत्वाचा तोटाही झाला. 1981 मध्ये करीम लालाच्या पठाण गँगने दिवसाढवळ्या दाऊदचा भाऊ शब्बीरची हत्या केली. यामुळे दाऊद प्रचंड संतापला. यानंतर मुंबईत जोरदार गँगवॉर पाहायला मिळालं. शब्बीरच्या हत्येनंतर 5 वर्षाने 1986 मध्ये दाऊद गँगने करीम लालाचा भाऊ रहीम खानची हत्या केली.
अखेर या गँगवॉरमध्ये दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीने करीम लालाच्या पठाण गँगचं अस्तित्वच संपवलं. करीम लालाचा 90 व्या वर्षी 19 फेब्रवारी 2002 ला मुंबईत मृत्यू झाला.