‘…म्हणून मी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला’; अशोक चव्हाण यांचा Tv9 मराठीवर मोठा खुलासा!
महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्षाचील नेते आपल्या पक्षांना रामराम ठोकत असल्याचं दिसत आहे. काँग्रेसचे मोठे नेते भाजपच्या गळाला लागलेत, आताच गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांनी पंजाची साथ सोडण्याचा निर्णय काय घेतला याचा खुलासा केला आहे.
मुंबई : काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी मोठा धक्का दिला. निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करत अशोक चव्हाणांनी राजकीय उलथापालथ केली. अशोक चव्हाण यांनी ईडी आणि सीबीआयच्या धाडींपासून वाचण्यासाठी कमळ हाती घेतल्याचं बोललं जात आहे. भाजपमध्ये जाण्यामागचं नेमकं कारण काय? याबाबत स्वत: अशोक चव्हाण यांनी टीव्ही9 मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.
काय म्हणाले अशोक चव्हाण?
माझं सर्व आयुष्य काँग्रेसमध्येच गेलं आहे. राजकीय परिस्थितीत अमूलाग्र बदल झाले आहेत. आपल्यासमोर आव्हाने आहेत. देशातील जनतेचा जो मूड आहे, शेवटी ज्यांच्या मतांनी निवडून जातो त्यांचा कौल काय आहे हे लक्षात घ्यावा लागतो. मी निर्णय घेताना सर्व बाबींचा विचार केला. मला काँग्रेसने सर्व काही दिलं. मीही काँग्रेसला भरपूर काही दिलं. काँग्रेसमुळेच मला भरपूर पदे मिळाले. नाकारत नाही. पण परिस्थितीनुसार लोकांचा कल बदलला आहे. नेतृत्वाबाबत लोकांचा कल वेगळा आहे. त्यामुळे मला बदल करण्याची गरज भासली. मी विचार करत होतो. त्यानुसार निर्णय घेतला. मला राज्यसभेत काम करता येईल याची मला खात्री असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहिली. निवडणुकीची तयारी दिसत नव्हती. राज्यात काही घडताना दिसत नाही. काँग्रेस अंतर्गत निवडणुकीची तयारी दिसत नाही. इंडिया आघाडीतही काही घडताना दिसत नाही. विविध पक्ष आघाडी सोडून जात आहेत. त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात. पण भविष्य काय आहे. अनेक लोकांचा आग्रह होता. त्यामुळे सर्व फॅक्टर समोर ठेवून मी निर्णय घेतला. माझं कुणाशी भांडण नाहीये. आपण मेहनत करणं, लोकांसमोर भूमिका मांडणं महत्त्वाचं आहे. पण राज्यात काहीच तयारी नव्हती. ही चलबिचलता अनेक मित्रांमध्ये आहे म्हणून मी निर्णय घेतल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.