ऋतुजा लटकेंनी नियमानुसार राजीनामा का दिला नाही?, मुंबई मनपा भाजपच्या माजी गटनेत्याचा सवाल
पण त्यांच्या पत्नीसोबत बनवाबनवी सुरू आहे याचं मला वाईट वाटतं.
विनायक डावरुंग, TV9 प्रतिनिधी, मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. पण, तत्पूर्वी त्या सरकारी सेवेत होत्या. ऋतुजा लटकेंनी नियमानुसार राजीनामा का दिला नाही? असा सवाल मुंबई मनपा भाजपच्या माजी गटनेता प्रभाकर शिंदे यांनी केलाय. प्रभाकर शिंदे म्हणाले, प्रशासनाच्या अधिकारावर मी बोलणार नाही. पण, नियमानुसार राजीनामा का दिला नाही? हे त्यांनी सांगावं. आयुक्तांनी राजीनामा मंजूर केल्यास आम्ही आक्षेप घेणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
प्रभाकर शिंदे म्हणाले, रमेश लटके हे माझे चांगले मित्र होते. त्यांच्यासोबत शिवसेना वाढवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले आहेत. त्यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे. पण त्यांच्या पत्नीसोबत बनवाबनवी सुरू आहे याचं मला वाईट वाटतं. राजीनामा का दिला? सप्टेंबरचा राजीनामा कंडिशनल आहे. त्यात जर निवडणूक लढवावी लागली तर असा उल्लेख होता.
ऑक्टोबरचा राजीनामा नियमानुसार 1 महिन्याची मुदत ठेवून आहे. खरंच त्यांना उमेदवारी द्यायची आहे का? की, त्यांना लटकवून ठेवायचं. भाजप, प्रशासन यांच्यावर खापर फोडायचं हे गैर आहे. जे पत्रकार परिषद घेतायत त्यांना नियम माहीत नव्हते का? असाही प्रश्न शिंदे यांनी विचारला.
मग दोन राजीनामे का दिले? याचा अर्थ काय आहे? जे स्वतःला विधिज्ञ समजतात. जे माजी विधी आणि न्यायमंत्री आहेत त्यांना हे माहीत नव्हतं का? की माहीत असताना गोंधळ घातला गेला?
आधी स्वतःबद्दल चिंतन करा. उगाच दुसऱ्यांच्या नावाने गाळे काढत बसू नका. मुंबई महापालिका नियमानुसार एक महिन्यांपूर्वी राजीनामा द्यायला हवा होता. पण आज त्या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी असतानाही प्रशासनावर दबाव आणला जातोय.
पर्यायी चेहऱ्यालाच उमेदवारी द्यायची आहे. म्हणून ही बनवाबनवी सुरू आहे का? दुसरा चेहरा पुढे आणण्यासाठी हे चालू आहे का? हे त्यांनी सांगावं, असंही प्रभाकर शिंदे म्हणाले.