खासदारकी रद्द करताना अभ्यास केला होता का?, आता 72 तास… संजय राऊत यांचा हल्लाबोल
इंडिया आघाडीची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला होत आहे. बैठकीला 226 पक्ष उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे. राहुल गांधी यांच्यासह अनेक मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
मुंबई | 6 ऑगस्ट 2023 : मोदी सरनेम प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल केली जाईल असं सांगितलं जात होतं. पण 72 तास झाले तरी राहुल गांधी यांना संसद सदस्यत्व बहाल करण्यात आलेलं नाही. गुजरात न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर 24 तासाच्या आत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. पण इथे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला 72 तास झाल्यानंतरही काहीच हालचाल न झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधींना संसदेतून बाहेर काढण्यात आलं. डिस्क्वॉलिफाय करण्यात आलं. सुरत न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर 24 तासात त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. सुरतच्या कोर्टाने निकाल दिल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालायने त्या निकालाला स्थगिती देऊन 72 तास उलटले आहेत. तरीही त्यांना संसदेत घेतलं जात नाही. लोकसभा अध्यक्ष म्हणतात, आम्ही अभ्यास करू. कसला अभ्यास करता? सुरत कोर्टाच्यानिकालावेळी अभ्यास केला नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि तुम्ही म्हणता अभ्यास करू? खरं म्हणजे त्यांना 24 तासात लगेचच राहुल गांधींना संसदेत घ्यायला हवं होतं, असं संजय राऊत म्हणाले.
म्हणून दूर ठेवण्याचा प्रयत्न
उद्यापासून संसद सुरू होत आहे. पुढचे चार पाच दिवस महत्वाचे आहेत. अनेक महत्त्वाचे विषय संसदेत येणार आहेत. दिल्ली सेवा बिल असेल, मणिपूर हिंसा असेल, अविश्वास ठरावाची चर्चा असेल या चर्चेपासून राहुल गांधींना दूर ठेवण्यासाठी त्यांना खासदारकी बहाल करण्याचा निर्णय घेतला जात नाही. या देशात कायदा आणि संविधान आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने दाखवून दिलं आहे. पण संसद ऐकायला तयार नाही. केंद्र सरकार आणि लोकसभा अध्यक्ष निकाल मानायला तयार नसेल तर काय बोलायचं? असा सवाल त्यांनी केला.
मोरल डाऊन नाही
सुरतचा निकाल लागल्यावर 24 तासात सदस्यत्व रद्द करता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर निर्णय घेत नाही हा काय प्रकार आहे? असा संतप्त सवालही त्यांनी केला. विरोधकांचं मोरल अजिबात डाऊन होणार नाही. आम्ही इंडिया आघाडी स्थापन केल्याने सत्ताधाऱ्यांचं मोरल डाऊन झालं आहे. त्यामुळेच ते असे निर्णय घेत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
बैठक निर्णायक होणार
यावेळी त्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीची माहिती दिली. इंडिया आघाडीची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला होत आहे. बैठकीला 226 पक्ष उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे. राहुल गांधी यांच्यासह अनेक मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्रीही असतील. ही बैठक निर्णायक ठरेल. त्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतली जातील.