कापसाचे दर वाढण्याची शक्यता का आली आहे चर्चेत? ही कारणं नीट समजून घ्या
कापसाचे दर चांगले राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. चालू हंगामात 1 ऑक्टोबर ते 14 डिसेंबर या अडीच महिन्याच्या काळात 58 लाख गाठी कापसाची आवक झाल्याचेही सांगण्यात आले.
मुंबईः बदलत्या हवामानामुळे देशातील कृषी क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. हवामानाचा फटका कृषी क्षेत्रीला बसलाच आहे. तर काही कृषी मालांना दर मिळाला आहे तर काही कृषी मालांना फटकाही बसला आहे. राज्यातील कापूस पीकाची मात्र अवस्था वेगळी असल्याचे सांगण्यात येत आहे. देशातील कापूस उत्पादन यंदा उद्योगाच्या अंदाजापेक्षा कमीच राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील हंगामात कापसाला चांगला दर मिळाला होता.
त्यामुळे यंदा देशातील कापूस लागवड वाढली होती. त्यानंतर पिकाला पावसाचा फटका बसून किडिचा प्रार्दूभाव झाला होता. त्यामुळे उत्पादकताही कमी राहिली होती.
भारतासोबतच पाकिस्तान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांमधूनही कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जागतिक कापूस वापर कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
असे असले तरी कापसाचे दर चांगले राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. चालू हंगामात 1 ऑक्टोबर ते 14 डिसेंबर या अडीच महिन्याच्या काळात 58 लाख गाठी कापसाची आवक झाल्याचेही सांगण्यात आले.
मात्र गेल्या वर्षी याच काळात 106 लाख गाठी कापसाची आवक झाली होती म्हणजेच यंदा गेल्या वर्षीपेक्षा 45 टक्क्यांनी कापूस आवक कमी राहिली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मागील काही दिवसांपासून दर गडगडल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्री कमी केली होती. यंदा देशातील कापूस उत्पादन कमी असून डिसेंबर नंतर कापसाचे दर सुधारू शकतो याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.
शेतकऱ्यांकडून सध्या गरजेपुरताच कापूस विकला जातो. सध्या कापसाला 8400 ते 9500 रुपये दर मिळण्याची शक्यता आहे. तसेच जानेवारीमध्ये कापसाचे दर वाढणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
शेतकऱ्यांना यंदा सरासरी 9000 रुपये दर मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्यांना विक्री केल्यास फायदेशीर ठरणार असल्याचा असा अंदाज कापूस अभ्यासकांनी केला आहे.