मुंबई | 5 जानेवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणी वाढल्याचं सध्याचं चित्र आहे. कारण रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणी ईडीचं धाडसत्र सुरु आहे. रोहित पवार या बारामती अॅग्रो कंपनीचे संचालक आहेत. याआधी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक विभागाने रोहित पवार यांच्याविरोधात कारवाई केली होती. प्रदूषण नियंत्रक विभागाने बारामती अॅग्रो कंपनीला 72 तासात प्लान्ट बंद करण्याचे आदेश दिले होते. पण याप्रकरणी रोहित पवारांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने या कारवाईला स्थगिती दिली होती. त्यानंतर आता रोहित पवार यांच्याशी संबंधित पुणे, बारामती आणि इतर अशा सहा ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. ईडीची ही कारवाई सुरु असतानाच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांचं एक ट्विट व्हायरल होतंय. याशिवाय स्वत: किरीट सोमय्या यांनीदेखील त्या ट्विटचा फोटो पुन्हा शेअर करत रोहित पवारांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
किरीट सोमय्या यांनी 1 जुलै 2021 ला रोहित पवार यांच्याविरोधात ट्विट केलं होतं. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या लिलावात फेरफार करुन कन्नड सहकारी साखर कारखाना अवघ्या 50 कोटी रुपयात खरेदी केला होता. या प्रकरणी ईडीने चौकशी करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे केली होती.
किरीट सोमय्या यांनी आपल्या या ट्विटचा फोटो पुन्हा ट्विट करत रोहित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. “मी पुन्हा एकदा तपास यंत्रणांना रोहित पवार यांच्याविरोधात सखोल तपास करण्याची विनंती करतो. कोट्यवधी रुपयांचा कन्नड सहकारी साखर कारखाना बारामती अॅग्रोने अवघ्या 50 कोटी रुपयांत विकत घेतला होता”, असं किरीट सोमय्या यांनी आपल्या नव्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
I once again request all investigative agencies to expedite investigation against #RohitPawar #BaramatiAgro
Hundreds Crores Kannada Sahkari Sakhar Karkhana was taken over by Baramati Agro at ₹50 crores. @BJP4India@Dev_Fadnavis@mieknathshinde pic.twitter.com/MZSj6ZSwuY
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 5, 2024
रोहित पवार हे शरद पवार यांच्या गटाचे आक्रमक नेते आहेत. ते बारामती अॅग्रोचे संचालक आहेत. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीने बारामती अॅग्रोवर आज छापा टाकलाय. पुण्यातील हडपसर येथील बारामती अॅग्रोच्या कार्यालयातदेखील ईडीने छापा टाकला आहे. ईडीचे सहा अधिकारी या कार्यालयात आज सकाळी दाखल झाले. अधिकाऱ्यांकडून सकाळपासून कागदपत्रांची झडती घेतली जात असल्याची माहिती मिळत आहे. बारामतीमधील पिंपळे येथे बारामती अॅग्रोचं कार्यालय आहे. तिथे देखील ईडीची धाड पडलीय. तसेच रोहित पवार यांचा छत्रपती संभाजीनगर येथे एक कारखाना आहे. तिथे देखील ईडीने धाड टाकली आहे.