अनिल देशमुख यांना जामीन मिळणार?, वकील इंद्रपाल सिंग यांचं म्हणणं काय
आता या प्रकरणात सीबीआय कोर्ट काय निर्णय घेणार हे पाहणे गरजेचे असेल.
ब्रिजभान जैसवार, Tv9, मराठी, प्रतिनिधी, मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातर्फे सीबीआय प्रकरणात जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल दाखल केला आहे. त्यावर मुंबई सत्र न्यायालयाने सीबीआयला 14 ऑक्टोबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचा निर्देश दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पीएमएलए प्रकरणात जामीन मंजूर केला. त्यानंतर सीबीआय कोर्टामधूनदेखील जामीन मिळवण्यासाठी अनिल देशमुख यांच्याकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने ईडीमार्फत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये अनिल देशमुख यांना जामीन दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे अनिल देशमुख यांच्यातर्फे विशेष सीबीआय कोर्टामध्ये जामीन अर्ज दाखल केला गेला आहे. यासंदर्भात अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी माहिती दिली.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी कथित वसुली प्रकरणाचा आरोप लावला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयद्वारे करण्यात यावा, अशी मागणी अॅड. जयश्री पाटील यांनी केली होती.
मात्र मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला. नंतर सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीतर्फे ECIR दाखल करण्यात आला. यानंतर ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली होती.
अनिल देशमुख यांच्या विरोधात या प्रकरणातील सहआरोपीस निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हे सर्वात प्रथम अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआय प्रकरणात माफीचा साक्षीदार बनले. देशमुख यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी सीबीआयच्या विशेष कोर्टाने त्यांना मंजुरी दिली आहे.
मात्र याच आरोपीच्या साक्षेवर अविश्वास असल्याचे उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविले. त्यामुळे आता या प्रकरणात सीबीआय कोर्ट काय निर्णय घेणार हे पाहणे गरजेचे असेल. गेल्या अकरा महिन्यांपासून देशमुख जेलमध्ये आहेत.