अंधेरी येथील गोखले रेल्वे पुलाचे काम केव्हा पूर्ण होणार ? पालीकेने दिली नवीन डेडलाईन
अंधेरी रेल्वे स्थानकाशेजारील गोपाळकृष्ण गोखले पुलाची पादचारी मार्गिका साल 2018 रोजी जुलै महिन्यात कोसळून जीवितहानी झाली होती. त्यानंतर हा पुल पाडून त्याजागी नवीन पूल बांधण्याची योजना आखण्यात आली आहे.
मुंबई | 29 जुलै 2023 : अंधेरीचा गोखले पुलाची पादचारी मार्गिका कोसळून झालेल्या अपघातानंतर या पुलाचा पुनर्विकास गेली पाच वर्षे रखडला आहे. अंधेरी पूर्व ते पश्चिम कनेक्टीवीटी महत्वाचा असणाऱ्या गोखले पूलाचे बांधकाम उत्तरेकडील पूरपरिस्थितीमुळे आता आणखी काही महिने रखडण्याची चिन्हे आहेत. याआधी हा पुल डिसेंबर 2023 पर्यंत तयार होणार होता. हरियाणा येथील अंबालामध्ये या पुलाचे गर्डर तयार होत असून त्याच पुरजन्यस्थितीमुळे पोहचण्यास विलंब लागणार असल्याने आणखी काही महिने वाट पहावी लागणार असल्याचे म्हटले जात आहे.
अंबाला वर्कशॉप येथील पूरजन्य परिस्थिती सामान्य होण्यासाठी पंधरवडा लागू शकतो. आतापर्यंत एक किमीपर्यंत लांबीच्या गर्डरचे 500 मीटरपर्यंतचे काम फॅब्रिकेशनचे काम संपले आहे. उर्वरित काम सुरु असल्याचे एचएमएम इन्फ्राने एबी इन्फ्राबिल्ड कंपनीला कळविले आहे. पंजाब आणि हरियाणातील अतिवृष्टीने वर्कशॉपमध्ये दोन ते अडीच फूटापर्यंत पाणी भरले आहे. त्यामुळे संपूर्ण काम ठप्प झाले आहे.
90 कोटी रुपपांचे बजेट
आम्ही लवकरच काम सुरु करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पत्र एचएमएम इन्फ्रा कंपनीने मुंबईच्या एबी इन्फ्राबिल्ड कंपनीला 11 जुलै रोजी पाठविले आहे. नवीन ब्रिज पोलादी स्टीलचा असणार आहे. त्याचे स्ट्रक्चर विविध भागात अंबाला येथे तयार करण्यात येत आहे. त्यानंतर ते मुंबईत आणून जोडले जाणार आहे. नवीन स्टील ब्रिजची किंमत 90 कोटी रुपये आहे. त्यावर सहापदरी वाहतूक आरामात होईल इतकी त्याची क्षमता आहे. गोखले ब्रिज नोव्हेंबर 2022 पासून वाहतूक पोलिसांच्या सूचनेनूसार बंद करण्यात आला आहे.
नवीन पूल स्टील गर्डरचा
अंधेरी रेल्वे स्थानकाशेजारील गोपाळकृष्ण गोखले पुलाची पादचारी मार्गिका साल 2018 रोजी जुलै महिन्यात कोसळून जीवितहानी झाली होती. त्यानंतर या पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. आणि एक दिशेची वाहतूक ही सुरु करण्यात आली होती. त्यानंतर हा पूल पुन्हा बंद करुन त्याच्या जागी नवीन पुल बांधण्याची योजना मुंबई महानगर पालिकेने आखली असून नवीन पूल स्टील गर्डरचा असणार आहे.
गर्डरचे काम होण्यास विलंब
एबी इन्फ्राबिल्ड लि. या कंपनीला या पुलाचे कंत्राट मुंबई महानगर पालिकेने दिले होते. या कंत्राटदाराने अंबाला स्थित एचएमएम इन्फ्रा लि. या कंपनीला गर्डरच्या फॅब्रिकेशनचे काम सोपविले होते. एबी इन्फ्राबील्डने पालिकेला कळविले की अंबाला येथील वर्कशॉपमध्ये पुराचे पाणी साठल्याने या पुलाचे फॅब्रिकेशनचे काम रखडले आहे. अंबाला वर्कशॉपमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टीने पुर आल्याने गर्डरचे काम होण्यास आणखी महिनाभराचा उशीर लागू शकतो अशी माहीती अतिरिक्त पालिका आयुक्त पी.वेलारसू यांनी इंडीयन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले आहे.