Rains Update | शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी, महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढणार
कोकण आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबई : शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यात काही भागात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. काही भागात अद्याप पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाची गरज आहे. अशावेळी बंगालच्या उपसागरात कमी दाबाची निर्मिती झाली. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. मॉन्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे कोकण आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
या भागात येलो अलर्ट
हवामान विभागाने काही भागात येलो अलर्टचा इशारा दिला आहे. यात मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्ह्यापूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे. राज्यातील इतर भागात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
विजांच्या कडकडाटासह होणार पाऊस
नांदेड, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, वर्धा, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तसेच मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
पूर्व विदर्भात धानाचे रोवणे सुरू झाले आहेत. धानपिकाला पावसाची गरज आहे. पाऊस आल्यास रोवणी लवकर होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. ही प्रतीक्षा पूर्ण होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
कोल्हापुरात दुबार पेरणीचे संकट नाही
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या 53% इतकी पेरणी पूर्ण झाली. पाऊस कमी असला तरी तूर्तास दुपार पेरणीच संकट जिल्ह्यावर नसल्याचं जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी स्पष्ट केलंय.