महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी गोळ्या घालत हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील हत्येचा तपास गुन्हे शाखा करत आहे. या संदर्भात शनिवारी आणखी काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हत्येतील आरोपीच्या फोनमध्ये बाबा सिद्दिकी यांच्या मुलाचा देखील फोटो सापडला आहे. झीशान सिद्दिकी यांचा फोटो आरोपीला त्याच्या हँडलरने स्नॅपचॅटद्वारे पाठवला होता. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, ‘बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसंदर्भातील तपासात आणखी काही नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी संवाद साधण्यासाठी स्नॅपचॅटचा वापर करत होते.
मथुरेत पोलीस चकमकीनंतर अटक करण्यात आलेल्या लॉरेन्स बिश्नोई-हाशिम बाबा टोळीचा शुटर योगेश उर्फ राजू याने आणखी धक्कादायक दावा केलाय. बाबा सिद्दिकी हा चांगला माणूस नव्हता, त्याचे भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिमशीही संबंध होते असा दावा राजूने केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या योगेश उर्फ राजू लॉरेन्स हा बिष्णोई टोळीत असून तो अनेक गुन्ह्यात सहभागी आहे. दिल्लीत गेल्या महिन्यात झालेल्या नादिर शाह हत्या प्रकरणातील तो मुख्य शूटर आहे. मात्र, 12 ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या बाबा सिद्दिकी यांच्या हत्येशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचं तपासात आढळलं आहे.
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शुक्रवारी पाच लोकांना अटक करण्यात आली होती. बाबा सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्या आरोपींना त्यांनी मदत केल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेले पाच आरोपी हे सूत्रधार शुभम लोणकर आणि सूत्रधार मोहम्मद जीशान अख्तर यांच्या संपर्कात होते. हे दोघेही सध्या फरार आहेत. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 9 वर पोहोचली आहे. आणखी 3 जण फरार आहेत. ज्यांचा शोध सुरु आहे.
बाबा सिद्दिकी यांच्यावर मुंबईतील वांद्रे भागातील निर्मल नगर येथील त्यांचा मुलगा आमदार जीशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाजवळ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाबा सिद्दिकी यांचे उपचारादरम्यान लीलावती रुग्णालयात निधन झाले होते. त्यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली असली तरी पोलीस वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहेत.