तब्बल 500 कार्यकर्त्यांचा राजीनामा, भाजपात नाराजीनाट्य, अकोल्यातून कार्यकर्त्यांचा वाहनांचा ताफा नांदेडकडे रवाना
भाजपच्या दुसऱ्या यादीतही नाव नसल्याने मुर्तिजापूरचे भाजप आमदार हरीष पिंपळेंचं तिकीट कापलं जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर पिंपळे यांच्याऐवजी ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आलेल्या रवी राठींना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही ठिकाणी उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले जात आहे. काही ठिकाणी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराची आखणी केली जात आहे. काही ठिकाणी मित्रपक्षाला जागा जात असल्याने नाराजीनाट्य बघायला मिळत आहे. याच नाराजीनाट्यातून पक्षांतर्गत कलह बघायला मिळतोय. तर काही ठिकाणी थेट पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा दिला जातोय. अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूरमध्ये अशाच काहीशा घटना घडताना दिसत आहेत. मूर्तीजापूरमध्ये भाजपच्या जवळपास 500 पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याने मूर्तीजापूरच्या भाजप पदाधिकाऱ्यांचा मोठा ताफा नांदेडच्या दिशेला रवाना झाल्याची माहिती आहे.
अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूरमध्ये भाजपात राजीनामा सत्र सुरू झालं आहे. तर काल रात्री मुर्तीजापूर तालुक्यातील 300 पेक्षा जास्त भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामे पाठवले आहेत. त्यानंतर आज या मतदारसंघातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या जवळपास 200 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी पक्षाकडे राजीनामे पाठवले आहेत. विशेष म्हणजे भाजपचे अनेक पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटायला रवाना झाले आहेत. भाजपच्या दुसऱ्या यादीतही नाव नसल्याने मुर्तिजापूरचे भाजप आमदार हरीष पिंपळेंचं तिकीट कापलं जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर पिंपळे यांच्याऐवजी ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आलेल्या रवी राठींना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कार्यकर्त्यांचा मोठा ताफा नांदेडच्या दिशेला रवाना
या विरोधात आज बार्शीटाकळी तालूक्यातील शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष, शहर प्रमुख, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी हरीष पिंपळे यांच्याशिवाय दुसरा उमेदवार चालून घेणार नसल्याचा इशारा पक्षाला दिला आहे. तर हे सर्व कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेडमध्ये असल्याने त्यांना भेटायला नांदेडच्या दिशेला रवाना झाले आहेत. तर पक्ष उमेदवारी देणार नसेल तर पिंपळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान पक्षाने दुसरा उमेदवार दिल्यास आपण पक्षाचं काम करणार नाही, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.