बहिणींचं नातं आमच्या भावांना कळलंच नाही… सुप्रिया सुळे यांचा अजितदादांना टोला विधानाने अनेकांच्या काळजात चर्र..
विधानसभा निवडणुकीला अवघे काही महीने बाकी आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज निवडणुकीचं रणशिंग फुंकलं असून मुंबईत मविआचा मेळावा सुरू आहे. यावेळी मविआ नेत्यांनी भाजप आणि शिंदे सरकारवर टीका केली. खासदार सुप्रिया सुळे यांनही अजित पवारांच्या विधानांचा समाचार घेतला.
‘लोकसभेपर्यंत कोणालाच त्यांच्या बहीणी आठवल्या नाहीत, पण निकालानंतर त्यांना बहीण आठवायला लागली. दुर्देव एका गोष्टीचं म्हणजे बहिणीचं नातं आमच्या भावांना कळलंच नाही ‘ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना टोला लगावला. महायुतीत सामील असलेल्या अजित पवार यांनी जाहीर केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ वरून तसेच लोकसभेत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करणं ही चूक होती, हे त्यांनी मान्य केलं , या दोन्ही मुद्यांवरून सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या मुंबईत झालेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे यांनी हे उद्गार काढताच अनेकांच्या काळजात चर्र झालं
यावेळी त्यांनी लोकसभेतील विजयासाठी मदत करणाऱ्या मविआतील शिवसेना ( उद्धव ठाकरे) आणि काँग्रेस यांचेही मन:पूर्वक आभार मानले. आम्हाला जिंकून आणण्यासाठी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केलीत, तसेच कठोर परिश्रम आम्ही येत्या विधानसभेत करू आणि मविआच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणू असे आश्वासनही सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिले.
त्यांना बहिणीचं नात कळलंच नाही
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ तसेच लाडका भाऊ योजनाही जाहीर केली. मात्र विरोधकांनी त्यावर कडाडून हल्ला चढवत सरकारला धारेवर धरलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी टोला लगावत अजित पवार यांना सुनावलं. ‘ लोकसभेनंतर कुणालाच बहीण आठवली नाही. रिझल्ट नंतर त्यांना बहीण आठवायला लागल्या. दुर्देव एका गोष्टीचं बहिणीचं नातं आमच्या भावांना कळलंच नाही. त्यांनी प्रेम आणि व्यवसायात गल्लत केली. प्रेमात व्यवसाय आणि पैसे नसतात. आणि व्यवसायात प्रेम नसतं. कारण व्यवसायात प्रेम केलं तर नाती अंगावर येतील. आणि प्रेमात पैसे आले त्याला नातं म्हणत नाही.’ अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
आमचं तुमच्यावर लक्ष आहे.
महाराष्ट्र सरकारचं दुर्दैव आहे की त्यांना व्यवसाय आणि प्रेमाचं नातं कळलं नाही. ते म्हणतात एक बहीण गेली तर दुसरी बहीण आणू. पण १५०० रुपयाला हे नातं विकाऊ नाही हो. आमच्या नात्याचा अपमान.. मुळातच बहीण भावाचं प्रेम असतं त्याला किंमत लावण्याचं पाप या राज्य सरकारने केलं.
आमचे दोन वीर बंधू आहेत. एक म्हणाले, आमची रक्षणकर्ती बहीण कुठे मतदान करते. कधी तरी पोटातलं ओठात येतं. काळजी करू नका आमचं लक्ष आहे. तुमच्यावर. ऑक्टोबरनंतर तुम्हाला १० हजार दिले तसे परत घेण्याची ताकद आमच्यात आहे, असं एक म्हणाला. हे बहिणींची लिस्ट तयार करणार आहे. यांचं कोणतंही नातं प्रेमाचं नाही. ते मताचं आहे. कोणत्या बुथवर किती मते पडली त्यावर ते पैसे देणार आहे. तुम्ही सर्व बहिणींचे नाही एकाच बहिणींचे पैसे घेऊन दाखवाच, असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी दिला.