मोदींनी कितीही डोळे मारले… खुणावलं तरीही… संजय राऊत काय म्हणाले?
मोदींनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबद्दल केलेलं विधान, त्यांच्या संकट काळात मदीतला धावून जाऊ, हे सगळं वक्तव्य खोटं आहे. महाराष्ट्राला आणि शिवसेनेला अडचणीत आणण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी पैशाच्या बळावर आणि ईडीच्या ताकदीवर बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला.
उद्धव ठाकरेंवर संकट आलं तर सर्वात आधी मी त्यांच्यासाठी धावून जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. मोदी यांच्या या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. मोदींनी कितीही डोळे मारले आणि आम्हाला खुणावलं तरी काही उपयोग होणार नाही. महाविकास आघाडीतील कोणताही घटक पक्ष त्यांच्या कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मोदींनी पवार कुटुंबावर केलेल्या टीकेवरही प्रत्युत्तर दिलं.
उद्धव ठाकरेंबद्दलच्या या विधानाचा शरद पवार यांनीही समाचार घेतला होता. मोदींनी लाख म्हटलं असेल, पण मोदींची मदत घेण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर कधीच येऊ नये असं शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या याच विधानाला दुजोरा देत संजय राऊत यांनी मोदींवर हल्ला चढवला. ‘ मोदी हे वारंवार आमच्याकडे खिडकीतून डोकावून पाहत आहेत आणि त्यातच कळत आहे देशातील निकाल कोणत्या दिशेने चालला आहे. पण मोदींनी कितीही डोळे मारले, खुणावलं, खिडकीतून वा गच्चीवरून, फटीतून, दारातून, पायरीवरून बघितलं तरी महाविकास आघाडीतला कोणताही घटक हा कोणत्याही आमिषाला दहशतीला बळी पडणार नाही ‘ असं संजय राऊत यांनी सुनावलं.
भीतीतून मोदी हे सगळं करत आहेत
मोदींनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबद्दल केलेलं विधान, त्यांच्या संकट काळात मदीतला धावून जाऊ, हे सगळं वक्तव्य खोटं आहे. महाराष्ट्राला आणि शिवसेनेला अडचणीत आणण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी पैशाच्या बळावर आणि ईडीच्या ताकदीवर बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला. ही भूमिका ज्यांनी घेतली आणि बेईमान लोकांच्या हाती शिवसेनेच्या बेईमान लोकांच्या हाती ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्यबाण सोपवलं त्यांच्यावर काय विश्वास ठेवता ? असा सवाल राऊत यांनी विचारला.
मोदींच्या पायाखालून जमीन सरकली आहे. पराभवाची भीती वाटत आहे. त्यांनी जे कांड केलं ते महाराष्ट्रातल्या जनतेला दिसलं आहे, जनता खवळली आहे हे सत्ताधाऱ्यांना दिसत आहे. मोदी आणि शाह यांनी मिळून महाराष्ट्र तोडण्याचं, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस याचे तुकडे करण्याचं, माणसं विकत घेण्याचं, दहशत निर्माण करण्याचं, मुंबई तोडण्याचं जे कारस्थान रचलं ते यशस्वी झालं नाही. आजही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात मोदी यांना त्यांची जागा दाखवण्यासाठीठामपणे उभा आहे. उद्या आम्ही सत्तेत येऊ आणि त्यांना जाब विचारू, त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल त्यांच्यावर खटले दाखल करू, या भीतीतून ते सगळं करत आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली.
प्रकाश आंबेडकरांवर साधला निशाणा
यावेळी संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांवरही निशाणा साधला. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणावे अशी त्यांना शुभेच्छा आहे. शिवसेनेने दिलेले उमेदवार हे सर्वसामान्य घरातील असतात आणि ते ओरिजनल असतात, स्वतःचे असतात. दुसऱ्यांकडून आम्हाला उमेदवार घेऊन आमचे म्हणून आम्हाला मिळवावे लागत नाहीत असा टोला त्यांनी लगावला.
कल्याण मधील गृहिणी गृहिणी दहशतवाद्याविरुद्ध उभी आहे, तिला प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने त्या महिलेला निवडणूक लढण्याचा अधिकार दिला आहे. मात्र प्रकाश आंबेडकर त्या महिलेचा अपमान करत असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा दुर्दैव आहे , असं ते म्हणाले. कल्याण डोंबिवली मधील संपूर्ण वंचित समाज हा वैशाली दरेकर म्हणजे शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे हे आंबेडकर साहेबांना देखील माहित आहे , असंही राऊत यांनी नमूद केलं.