‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यात यश : मुख्यमंत्री
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यात यश आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यात यश आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. कोरोना वाढीचा दर तसेच मृत्यू दर कमी होताना दिसत असले तरी गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी राहू द्या, असं मुख्यमंत्री म्हणाले. (My Family, My Responsibility campaign succeeds in preventing the spread of corona infection Says Cm Uddhav thackeray)
कोरोना संसर्ग रोखण्यात आपण काही प्रमाणात यशस्वी झालो असून डिसेंबरमध्येही ही मोहीम परिणामकारकपणे राबविण्याचे नियोजन करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास दिल्या. दिवाळीनंतर पुढचे 15 दिवस जागरुकतेचे आहे. त्यादृष्टीने सावधानता बाळगा आणि मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, हात वारंवार धुणे या नियमांचे पालन नागरिक करतील हे काटेकोरपणे पाहा, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि कोविडसंदर्भात उपाययोजनांची माहिती करून घेतली. या बैठकीत आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, तसंच टास्क फोर्सचे डॉक्टर्स सहभागी झाले होते.
हे वर्ल्ड वॉर आहे असे मी मार्च महिन्यात म्हणालो होतो, इतक्या महिन्यांमध्ये आपण हत्यार नसतानासुद्धा विषाणूवर काबू मिळविण्यासाठी लढलो आणि आपल्याला यश येत आहे असे दिसते. या विषाणूचा जेव्हा चंचूप्रवेश झाला तेव्हा आपण लॉकडाऊन केले आणि आता हळूहळू सर्व खुले करू लागलो आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
सुरुवातीला शहरात असलेला संसर्ग आता राज्यभर सर्वत्र पसरलाय. सुरुवातीच्या काळात विषाणूचा प्रसार मर्यादित ठिकाणी होता, मात्र आता ग्रामीण भागातसुद्धा रुग्ण सापडत आहेत. या सर्व कालावधीत उन्हाळा आणि पावसाळ्यात मोसमी आजार आढळले नाहीत, कारण आपण आरोग्यविषयक खबरदारी घेतली. मात्र आता थंडी आली आहे. या काळात कोविड व्यतिरिक्त इतर आजारही उफाळून येतात. विशेषत: ह्रदयविकार, न्यूमोनिया, अस्थमा, फ्ल्यू यासारख्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.
(My Family, My Responsibility campaign succeeds in preventing the spread of corona infection Says Cm Uddhav thackeray)
संबंधित बातम्या