इशारा देतं माझं वॉच, इंडिया जिंकणार आहे वर्ल्ड कप मॅच, मी घेणार राहुल गांधींची कॅच, रामदास आठवले यांची भन्नाट शायरी
मोदींच्या टीमने ही चांगली तयारी केली आहे. त्यामुळे मी राहुल गांधीं यांची कैच घेणार आहे. संजय राऊत यांचा पासपोर्ट हरवला असेल तर आम्ही त्यांना तो देऊ. २०२४ नंतर त्यांना बाहेर जावे लागणार आहे. आम्ही त्यांचा पासपोर्ट जप्त करणार नाही, अशी टीका आठवले यांनी केली.
पुणे | 19 नोव्हेंबर 2023 : देशात वर्ल्ड कप मॅचचा फिव्हर सुरु आहे. टीम इंडियाला शुभेछ्या देण्यासाठी जागोजागी फलक लागलेत. अशातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शायरीच्या माध्यमातून टीम इंडियाला शुभेछ्या दिल्या आहेत. यावेळी त्यांनी राजकीय षटकारही लगावले आहेत. आजचा दिवस बोलण्याचा नाही. मॅच पाहण्याचा दिवस आहे. मॅच पाहण्यासाठी मी जाणार होतो. पण, अहमदाबादमध्ये मॅच पाहण्यापेक्षा इथे पुण्यात पाहण्यात आनंद आहे. सेमि फाइनलला मी गेलो होतो. तेव्हा इंडिया जिंकली. आता ऑस्ट्रेलियासोबत मॅच सुरू आहे. आताही ही मॅच जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रोहित शर्माची टीम घेणार आहे ऑस्ट्रेलियाचे १० कॅच? का जिंकणार नाही आपण ही मॅच? ही मॅच आपल्याला कोणत्याही परिस्थिती जिंकायची आहे. मोदींच्या टीमने ही चांगली तयारी केली आहे. त्यामुळे मी राहुल गांधीं यांची कैच घेणार आहे आणि मी ० वर त्यांना आउट करणार आहे, अशी शाब्दिक फटकेबाजी त्यांनी केली.
राजकारणाच्या खेळात तयारी करुन खेळायचं असत. नरेद्र मोदी हे ऐक्टिव असणारे खेळाडू आहेत. २०२४ ची त्यांनी चांगली तयारी केली म्हणून आम्ही ३५० रन करणार आहोत. आपण ३५० पेक्षा जास्त रन कराव्या. तुम्ही ३५० केल्या तर आम्ही ४०० रन करू. कसेही करून आम्हाला एनडीएचे सरकार आणायचं आहे, असा टोलाही त्यांनी इंडिया आघाडीला लगावला.
कॉंग्रेसच्या विरोधात भ्रष्टाचाराची बाजू मांडली आणि एनडीएचे सरकार आणू. सगळ्या पक्षाचे लोक एकत्रित येत आहेत. त्यांना शिव्या देतायेत. काही जण व्यक्तिगत पातळीवर येताय. मात्र, हे सर्व सहन करण्याची ताकद आमच्यात आहे. हे सरकार मुस्लिमांच्या विरोधात आहे हा खोटा प्रचार करत आहेत. दलितांना भडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. संविधान बदलण्याचे काम सुरु आहे असा अपप्रचार सुरु आहे. पण, मोदी यांनी संविधानाला माथा टेकवून काम केलं आहे असे आठवले म्हणाले.
मनोज जरांगे यांनी आंदोलन केलं. त्यांनी सगळ्यांना जाग केलं आहे. माझ्या पक्षाचा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. मात्र, त्यांनी त्यांच्या मागणीत बदल करावा. ओबीसीतून न देता वेगळा प्रवर्ग तयार करावा. स्वतंत्र ओबीसीची यादी तयार करावी. तो अधिकार राज्य सरकारला आहे. सरकारने तसा निर्णय घेऊन आम्हाला पाठवावा. तामिळनाडूच्या धर्तीवर असा निर्णय घेतला तर प्रश्न सुटेल असेही त्यांनी सांगितले.
मंत्री छगन भुजबळ असं म्हणतात की मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही. फक्त ओबीसीमध्ये ते नको. त्यामुळे भुजबळ आणि जरांगे यानी हा वाद मिटवावा. पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. शरद पवार आणि अजित पवार ही मराठा फैमिली आहे. मला माहिती आहे की ते मराठा आहेत. पण, त्यांच्याबद्दल जे कोणी काही सांगत आहेत त्यात तथ्य नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले.