Nagar Panchayat Election result 2022 : ज्या मतदारसंघात पटोलेंनी मोदींना मारण्याची भाषा केली, तिथं काँग्रेस हरली की जिंकली?
काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. त्यांचा जेवनाळा गावातील प्रचारामधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि जिल्हा परिषद, नगरपंचायत निवडणूक निकालाच्या एक दिवस अगोदरच राजकीय धुळवड रंगलेली पाहायला मिळाली.
नागपूरः गेले दोन दिवस राज्यात एकाच व्यक्तीवरून विरोधकांनी जोरदार आघाडी उघडली आहे. ती व्यक्ती म्हणजे काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. त्यांचा जेवनाळा गावातील प्रचारामधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केल्याचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि जिल्हा परिषद, नगरपंचायत निवडणूक (Nagar Panchayat Election ) निकालाच्या एक दिवस अगोदरच राजकीय धुळवड रंगलेली पाहायला मिळाली. मात्र, ज्या ठिकाणच्या प्रचारात नाना पटोले (Nana Patole) गेले होते, तिथे नेमके काय झाले, याची उत्सुकता आपल्याला असेलच. जाणून घेऊयात तिथलीच ही राजकीय बित्तमबातमी.
त्या ठिकाणी काय झालं?
महाराष्ट्रातील 106 नगरपंचायती आणि भंडारा आणि गोंदियातील जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील काही जागा, महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान काल पार पडले. त्याचे निकाल आज लागले. या निवडणूक रणधुमाळीत अख्खे राज्य निकालाच्या आधी एक दिवस नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गाजले. नानांनी पालांदूर जिल्हा परिषद मतदार संघात हे भाषण केले होते. या ठिकाणी काँग्रेसच्या सरिता कापसे आज विजयी झाल्याचे आज पाहायला मिळाले. एका अर्थाने नानांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला. मात्र, त्या जागेवर काँग्रेस उमेदवार विजयी झाल्याने नानांना एक प्रकारचा दिलासाही मिळाल्याचे म्हणावे लागेल.
व्हिडिओमध्ये पटोले नेमकं काय म्हणाले?
“मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळत आहे.
गावगुंड गावलाच नाही…
सर्व प्रकरण अंगलट आल्यानंतर, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत बोललोच नाही. गावातील एका गावगुंडाबाबत मी ते विधान केलं आहे, अशी सारवासारव नाना पटोले यांनी केली. पण टीव्ही 9 मराठीच्या टीमने खरंच मोदी नावाचा गावगुंड आहे का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. भंडाऱ्यातील देवनाळा या गावात पटोले यांनी हे विधान केलं होतं. पटोलेंच्या सुकळी या गावाशेजारीच हे गाव आहे. त्यामुळे मोदी नावाचा खरंच कोणी गावगुंड सुकळीत आहे का? या गावगुंडाबाबत पटोलेंकडे ग्रामस्थांनी खरंच तक्रार केली होती का? याचा शोध घेण्यासाठी टीव्ही9 मराठीची टीम थेट भंडाऱ्यातील सुकळीत पोहोचली. तरुण ग्रामस्थांपासून ते 80 वर्षाच्या स्थानिक ग्रामस्थांबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. एका तरुणाने मोदी नावाचा गावगुंड सुकळीत राहत नसल्याचं सांगितलं. तर, एका 80 वर्षाच्या आजोबांना मोदी नावाचा गावगुंड गावात राहतो का? असं विचारलं. तर नाय जी, नाय जी, असं म्हणून त्यांनी असा गावगुंड गावात राहत नसल्याचं सांगितलं. आपलं वय 80 वर्ष असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच 80 वर्षात या नावाचा गावगुंड कधी दिसला नसल्याचंही त्यांनी सांगितलं. इतरांनीही नन्नाचा पाढा वाचला.
इतर बातम्याः
Nashik | लोकशाहीवरील अढळ निष्ठेसाठी विविध कार्यक्रम, जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्व संस्थांना सूचना काय?