नागपूरः नागपूरच्या जरीपटका भागात मोठी चोरी (Big theft) झाल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरातील कुकरेजा लेआऊटमधील एका घरात चोरट्यांनी (Nagpur theft) जबरी चोरी केली. घरात कुणीही नाही नाही हे पाहून चोरट्यांनी रात्रीच्या वेळी कुलूप तोडले. घरातील 20 ते 25 लाख रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी पळवले. सकाळी घराचे कुलूप तोडलेले दिसल्यावर शेजाऱ्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर सदर घटनेची पोलिसांना (Police) माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असता गेल्या काही दिवसात एकाच पद्धतीने चोरीच्या घटना घडत आहेत. त्यानुसारच हीदेखील चोरी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
जरीपटका भागात एवढी जबरी चोरी झाली. त्याच दरम्यान रात्री आणखीही दोन ठिकाणी अशी चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. जरीपटका भागातील चोरी केलेल्या चोरट्यांनीच याही ठिकाणी डल्ला मारला असावा, असा अंदाज पोलीस वर्तवत आहेत. दुसऱ्या घटनेत चार लाखांचा तर तिसऱ्या घटनेत दीड लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नागपूरमध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे एकाच पद्धतीने काही घरात चोरी झाल्याचं दिसून आलं आहे. उन्हाळ्याच्या सुटीत अनेक जण बाहेरगावी जाण्याच्या बेत आखतात. मात्र अशा प्रकारे घराला कुलूप लावून बाहेर जाणेही आता जिकिरीचे झाले आहे. दररोज चोरीच्या घटना ऐकून नागरिकांमध्येही दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे आता अशा घटनांना आळा घालण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलीस आता चोरांच्या मुसक्या कशा आवळतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.