नागपुरात ‘कोरोना इफेक्ट’, चहा टपरी ते दारुची दुकानं बंद, एसटीत एका सीटवर एक प्रवासी
नागपुरात शिकायला आलेल्या 30 हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या दहशतीमुळे नागपूर शहर सोडल्याची माहिती आहे Nagpur Corona Effect on Daily Life
नागपूर : मुंबई आणि पुण्यानंतर सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या नागपूरमध्येही ‘कोरोना इफेक्ट’ पाहायला मिळत आहे. नागपुरात आज पान टपऱ्या, चहा टपऱ्या, रेस्टोरंट, बार आणि दारुची दुकानं बंद आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. कोरोनाच्या दहशतीमुळे सकाळच्या वेळेत रस्त्यांवर होणारी गर्दीही ओसरली आहे. (Nagpur Corona Effect on Daily Life)
नागपुरात कोरोनाचे चार रुग्ण आढळले असून 50 पेक्षा जास्त संशयित आहेत. नागपुरात शिकायला आलेले विद्यार्थी कोरोनाच्या दहशतीमुळे शहर सोडून जात आहेत. साधारण 30 हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नागपूर शहर सोडल्याची माहिती आहे. शाळा-कॉलेज बंद असल्याने विद्यार्थी आपल्या गावाला निघाले.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून एसटी बसमध्ये एका सीटवर एकाच प्रवाशाला बसवलं जात आहे. दोन प्रवाशांमध्ये तीन फूट अंतर राहिल, याची खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एसटी डेपो प्रशासनाने काळजी घेतली आहे.
“नागरिकांनी काही दिवसांसाठी घराबाहेर पडणं टाळावं. गरज असेल तरच घराबाहेर पडावं. घराबाहेर पडलात तर कुणाशीही हँडशेक करु नका”, असं आवाहन नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल केलं होतं.
“कोरोनाच्या पार्श्वभूवीर लग्न, समारंभांचे हॉल बंद करण्यात आले आहेत. एखादे आवश्यक लग्न असेल तर परिवारातीलच 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. किराणा, भाजीपाला आणि दूध अशा जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु राहतील. आठवडी बाजार भाजीसाठी लागतात. त्यामुळे त्याविषयी अजून निर्णय घेतलेला नाही”, असं मुंढे यांनी सांगितलं होतं.
नागपुरात 4 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांची प्रकृती सुधारत आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांकडे कर्मचारी दररोज जाऊन आवश्यक सूचना देत आहेत. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची पूर्णपणे काळजी घेतली जात आहे.
विमानतळावर निगेटिव्ह रिपोर्ट, रत्नागिरीच्या रुग्णाला ‘असे’ झाले कोरोनाचे निदान https://t.co/xLkaXqDQTG
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 19, 2020
“नागपुरात सध्या एक कंट्रोल रुम तयार करण्यात आली आहे. या कंट्रोल रुमचा दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. या क्रमांकावर कुणाचा फोन आल्यास टीम घरी जाते. आतापर्यंत 200 पेक्षा जास्त फोन आले आहेत”, असं मुंढे यांनी सांगितलं होतं. (Nagpur Corona Effect on Daily Life)