अहो भाग्यम्!! महाराष्ट्रालाही सोन्याचे दिवस, चंद्रपूरनंतर ‘इथे’ सापडले मौल्यवान धातूचे साठे
त्यामुळं हा सोनेरी साठा महाराष्ट्राला झळाळी आणणार की तसाच जमिनीखाली राहणार, यासंबंधीची माहिती लवकरच समोर येईल.
नागपूरः महाराष्ट्राला (Maharashtra) लवकरच सोन्याचे दिवस येणार आहे. कारण चंद्रपूर आणि भंडारा पाठोपाठ आता नागपूरतही (Nagpur) सोन्याचे (Gold) साठे आढळले आहेत. तसा अहवाल भूगर्भ सर्वेक्षण विभागानं दिलाय. त्याशिवाय इतर मौल्यवान धातुसाठे असल्याचंही सर्वेक्षणात पुढं आलंय.
विदर्भाच्या काळ्या मातीखाली सोनं दडलंय. भूगर्भ सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात हे सत्य पुढं आलंय. यापूर्वी चंद्रपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यात सोन्याचे साठे असल्याचं सर्वेक्षणात पुढं आलं होतं. आता राज्याच्या उपराजधानीतही सोन्याचे साठे असल्याचं पुढं आलंय. नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील परसोडी, किटाळा आणि मरुपार या गावांच्या खाली सोन्याचे साठे आहेत.
मात्र, त्याचं प्रमाण अत्यल्प असल्याचा अंदाज आहे. याशिवाय इतर मौल्यवान धातुसाठा असल्याचं सर्वेक्षणातुन पुढं आलंय.
नागपूर जिल्ह्यात सोन्याचे साठे आढळले असले तर ते कमी प्रमाणात असल्याने अद्याप खाणींसाठी लिलाव झाला नाही. त्यामुळं हा सोनेरी साठा महाराष्ट्राला झळाळी आणणार की तसाच जमिनीखाली राहणार, ही येणारी वेळ सांगेल.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव आणि राजोली पेठगावाजवळील बामणी येथे भूगर्भात सोने असल्याचे केंद्र सरकारच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागाला आढळले आहे.
त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यालाही भविष्यात अधिक महत्त्वा प्राप्त होणार आहे.