Nagpur : सरकारी कारभार… 10 हजारांचा टॅबलेट 18 हजारांत! नागपुरात ‘महाज्योती’ने आरोप फेटाळले
सर्वात कमी दर असलेल्या कंत्राटदारांकडून टॅबलेट खरेदी करण्यात आले. यात कुठेही घोटाळा झालेला नाही, असं स्पष्टीकरण महाज्योती संस्थेचे संचालक डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिलंय.
नागपूरः इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी सुरु झालेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात ‘महाज्योती’मध्ये (Mahajyoti) कोट्यवधींचा टॅबलेट घोटाळा (Tablet Scam) झाल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. महाज्योतीने 10 ते 11 हजार रुपये असे बाजारमूल्याचे तब्बल 6 हजार टॅबलेट 18 हजार 899 रुपयांना विकत घेतले. लेनोवो टॅबलेट (Lenovo Tablet) खरेदीच्या या प्रक्रियेत तब्बल 4 कोटी 80 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं माहितीतून समोर आलं आहे. मात्र महाज्योती कडून सदर आरोप फेटाळण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या पोर्टलवरील नियमानुसारच सदर टॅबलेट खरेदी झाली असून त्यात कोणताही घोटाळा झाला नसल्याचं मत संचालकांनी मांडलं आहे. नियमानुसारच टॅबलेटसाठी निविदा काढण्यात आल्या आणि पुढील प्रक्रियाही करण्यात आल्याचं संचालकांनी सांगितलं.
महाज्योती काय आहे?
इतर मागासवरग्, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग या दुर्लक्षित घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी महाज्योती या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. ऑगस्ट 2019 मध्ये ही संस्था स्थापन झाली. महाज्योती संस्थेकडून एमपीएससी आणि यूपीएससीसह जेईई, नीट आदी परीक्षांचं प्रशिक्षण दिलं जातं. मात्र या संस्थेच्या स्थापनेपासूनच विविध उपक्रमांवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण आणि प्रशिक्षण सुरु असल्याने त्यासाठी विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्यात आले होते. या टॅबलेट खरेदीच्या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे.
घोटाळा नेमका काय आहे?
महाज्योतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी 6 हजार ‘टॅब्लेट’ खरेदी केले होते. प्रति टॅब्लेट 18 हजार 899 रुपयांना खरेदी केले. या ‘टॅब्लेट’ चे बाजार मूल्य 10 ते 11 हजार रुपये आहे. त्यामुळं या खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. माहिती अधिकार कार्यकते आशिष फुलझेले यांनी सदर माहिती मिळवली. महाज्योतीने हा करार सप्टेंबर 2021 दरम्यान केला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर टॅबलेट घेतले असता 10 ते 11 हजार रुपयांचे बाजारमूल्य आणखी कमी होण्याची शक्यता होती. मात्र तसे न करता संस्थेने हे टॅबलेट 18 हजार899 रुपयांना विकत घेतले. त्यामुळे विक्रेत्याला 4 कोटी 80 लाख रुपये अधिक गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. संचालक मंडळाने विद्यार्थ्यांसाठी सरकारने राबवलेल्या योजनांतून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जात आहे.
संचालकांनी आरोप फेटाळले
दरम्यान, सदर टॅबलेटची खरेदी राज्य सरकारने नेमून दिलेल्या पोर्टलमार्फत झाल्याचं स्पष्टीकरण संचालकांनी दिलं आहे. त्यावेळी सर्वात कमी दर असलेल्या कंत्राटदारांकडून टॅबलेट खरेदी करण्यात आले. यात कुठेही घोटाळा झालेला नाही, असं स्पष्टीकरण महाज्योती संस्थेचे संचालक डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिलंय.