देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख, नागपूरमध्ये झळकले बॅनर, राजकीय वर्तुळात खळबळ
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकला आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात भावी मुख्यमंत्री म्हणून जोरदार चर्चा होत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून विविध ठिकाणी बॅनर झळकल्याचे पाहायला मिळाले. खरंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हायला शंभर टक्के आवडेल असे म्हणत आपली इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा व्यक्त करण्यापूर्वी अजित पवार हे भाजप सोबत जाणार अशाही चर्चा झाल्या होता. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोणत्याही क्षणी लागेल अशी शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला होता. त्यामध्ये संजय राऊत यांनी दिल्लीत मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याचा दावा केला होता. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये 16 आमदारांना अपात्र केल्यास एकनाथ शिंदे हे देखील अपात्र होतील असा तर्क लावत संजय राऊत यांनी हा दावा केला होता.
संजय राऊत यांनी हा दावा केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्याच दरम्यान अजित पवार काही आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करतील अशी चर्चा सुरू झाली होती. ती चर्चा अफवा असल्याचं स्वतः अजित पवार यांनी सांगितलं होतं.
त्यानंतरही अजित पवार यांचे त्यांच्या सासुरवाडीला बॅनर झळकले होते. त्याच दरम्यान आता नागपूर मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केलेले बॅनर झळकले आहे. भाजपचे पदाधिकारी बबलू गौतम यांनी हा बॅनर लावला आहे.
बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी हा बॅनर लावला आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात हे आहे तेच आम्ही लावले आहे. 2019 ला जनतेने देवेंद्र फडणवीस यांना बहुमत दिले होते. उद्धव ठाकरे यांना बहुमत दिले नव्हते असेही बबलू गौतम यांनी म्हणत देवेंद्र फडणवीस हे भावी मुख्यमंत्री असल्याचा दावा केला आहे.
राज्याच्या राजकारणात भावी मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरू असतांना नागपूर येथे लावण्यात आलेले फलक चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चा सुरू असतांना राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का? अशी चर्चा होऊ लागली आहे.
खरंतर भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचे आत्तापर्यन्त बॅनर झळकले आहेत त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.