Nagpur News : गरब्यासाठी येताना आधार कार्ड आणा, VHP चं आवाहन, शहरात सर्वत्र चर्चा
गरबा कार्यक्रमाचे आयोजन करताना प्रशासनाचे अधिकारी आणि गरबा आयोजक यांनी उपाययोजना कराव्यात. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड तपासावे अशी सूचना विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आली आहे.
सुनील ढगे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 11 ऑक्टोबर 2023 : नवरात्रीचा उत्सव सुरू होण्यास आता अवघे काही दिवस राहिले आहेत. थोड्याच दिवसांत देवीचा हा उत्सव सुरू होईल. नवरात्र म्हटलं की ठिकठिकाणी रास गरब्याचे आयोजन केले जाते. लहानांपासून, तरूण, मोठ्यापर्यंत अनेक जण यामध्ये उत्साहाने सहभागी होतात. देशात ठिकठिकाणी गरबा कार्यक्रमाची तयारी देखील सुरू झाली आहे.
त्याचदरम्यान आता विश्व हिंदू परिषदेने आता एक आवाहन केले आहे. गरबा कार्यक्रमासाठी येणाऱ्यांनी आधार कार्ड आणावे, त्यांचं आधार कार्ड तपासून त्यांना प्रवेश देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या आवाहनाची सध्या सर्वत्रच चर्चा सुरू आहे.
हा देवीचा उत्सव
आता नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. हा उत्सव हा हिंदूंच्या श्रद्धेचा आणि भक्तिभावाने मानण्याचा उत्सव आहे. मात्र ज्यांची श्रद्धा नाही असे लोक येऊन गैरप्रकार करतात म्हणून उत्सवाच्या मुख्य प्रवेश द्वारावर आयोजकांनी उपाययोजना करावी अशी सूचना विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आली आहे.
आधार कार्ड तपासा, माथ्यावर टिळा लावा
ज्यांना देवीप्रती, श्रद्धा नाही, विश्वास नाही असे अनेक लोक गरब्याला येतात. पण गरबा हा आस्थेचा आणि भक्तीचा विषय आहे. तो काही फक्त नृत्याचा कार्यक्रम किंवा ऑर्केस्ट्रा नव्हे. हा देवीला प्रसन्न करण्याचा उत्सव आहे. त्यामुळे गरबा आयोजक आणि प्रशासन या दोघांनीही गरबा केंद्रावर लोकांच्या प्रवेशासाठी उपाययोजना करावी. त्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर उभ राहून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आधार कार्ड तपासावं, त्या व्यक्तीला टिळा लावावा, त्यांच्या हातावर धागा बांधावा. त्यांना गोअर्क प्यायला द्यावा, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष, गोविंद शेंडे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.