मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘त्या’ आमदारांचा निक्काल लावण्यासाठी ओव्हरटाईम?; विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय काय?
Rahul Narvekar on Shivsena MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच निर्णय घेणार आहेत. त्यासाठी ओव्हरटाईम करावा लागणार असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय घडतं हे पाहावं लागेल.
गिरीश गायकवाड, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नागपूर | 07 डिसेंबर 2023 : आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशाला सुरुवात होण्याआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निर्णयावरही राहुल नार्वेकर यांनी भाष्य केलं आहे. तसंच अधिवेशन काळात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते, यावरही नार्वेकरांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला देण्यात आलेल्या कार्यालयाच्या जागेवरही राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय.
अपात्रता प्रकरणावर नार्वेकर म्हणाले…
या हिवाळी अधिवेशना दरम्यान अपात्र याचिकेवर सुनावणी घेणार आहे. जास्तीत जास्त वेळ घेऊन मी सुनावणी घेणार आहे. अधिवेशन आणि ही सुनावणी असं सगळं मॅनेज करणे हे एक आव्हान आहे. पण अधिवेशनासाठी पूर्ण वेळ देऊन महत्वपूर्ण बाबी असतील, त्यावर मी लक्ष देईन. प्रत्येक दिवसाचं विधिमंडळाचं कामकाज बघून आम्ही सुनावणी घेऊ. माझं काम ते सकाळी 9 ते रात्री 9 असे 12 तासांचं तरी असेल, असं राहुल नार्वेकर म्हणालेत.
राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावरही राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार अपात्रता प्रकरणावरच्या सुनावणी सुनावणीसाठी ट्रिपल ओव्हर टाइम करू. राष्ट्रवादी बाबत ज्या याचिका दाखल झाल्या आहेत. त्याचे रिप्लाय आले आहेत. लवकरच याबाबत सुनावणी सुरू करू, असं नार्वेकर म्हणाले.
राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतंय. हे अधिवेशन राज्याच्या गोर गरीब जनतेसाठी अत्यंत उपयोगी ठरेल. सर्व प्रश्नावर चर्चा होईल, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यालयावर नार्वेकर म्हणाले
विधिमंडळ अधिवेशन काळात राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पवार गटाला एकत्र कार्यालय देण्यात आलं आहे. अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांना एकाच कार्यालयात जागा देण्यात आली होती. मात्र नंतर या कार्यालयावरून आव्हाडांच्या नावाची पाटी काढण्यात आली. त्यामुळे या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या अधिनेशनात वादंग होण्याची शक्यता आहे. याबाबत राहुल नार्वेकर यांना प्रश्न विचारण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विधिमंडळ कार्यालयाला एक कार्यालय दिलं आहे. राष्ट्रवादीत दोन गट आहेत, अशी माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही. तसं कोणतही निवेदन देण्यात आलेलं नाही. त्यामुळे हे कार्यालय एकत्र आहे. आम्हाला वेगळा गट ठरवावा, असं माझ्याकडे निवेदन आलेले नाही. तसं निवेदन आले तर बघू, असं नार्वेकर म्हणालेत.