रोहित पवार म्हणजे राजकारणातील ऑरी!, शरद पवारांचा वाढदिवस असल्याने…; नितेश राणेंचा घणाघात
Nitesh Rane on Rohit Pawar Yuva Sangharsh Yatra and Sharad Pawar Birthday : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या युवासंघर्ष यात्रेवर भाजप आमदार नितेश राणे यांचा घणाघात. शरद पवारांच्या वाढदिवसाचा दाखला देत टीकास्त्र. ऑरीचाही नितेश राणे यांच्याकडून उल्लेख, वाचा सविस्तर...
नागपूर | 12 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात युवा संघर्ष यात्रा निघाली. या यात्रेच्या माध्यमातून तरूणांचे प्रश्न रोहित पवार यांनी जाणून घेतले. आज या युवा संघर्ष यात्रेची नागपुरात सांगता होणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या उपस्थितीत ही सांगता सभा होणार आहे. शरद पवार यांचा वाढदिवसही आज आहे. या सगळ्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. रोहित पवार म्हणजे राजकारणातील ऑरी!, असा उल्लेख त्यांनी केला आहे.
युवा संघर्ष यात्रेवर टीका
रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेची आज सांगता होते आहे, यावर तुमचं काय मत आहे? असा प्रश्न पत्रकारांनी नितेश राणे यांना विचारला. तेव्हा, कोण??? ऑरी का? ही सभा बरोबर 12 डिसेंबरला ठेवली आहे. जेव्हा आमच्या आदरणीय शरद पवारसाहेबांचा वाढदिवस आहे. नाहीतर 4 टाळकी पण जमली नसती… म्हणून पवार साहेबांचा वाढदिवस पाहून कार्यक्रम ठेवला गेला, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
पवारांना शुभेच्छा
शरद पवार हे आज 83 वर्षांचे झाले. तरी पण आज पण ते ज्या पद्धतीने फिरतात. ते आमच्यासारख्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत. म्हणून पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. उध्दव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावर नितेश राणे यांनी टीका केली आहे. उध्दव ठाकरेला काय काम आहे शुभेच्छा देण्याच्या पलीकडे? झब्बा कुर्ता घालायचा आणि उभं राहायचं, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.
मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षा राजीनामा, राणे म्हणाले…
राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायामूर्ती आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यावर नितेश राणे यांनी भाष्य केलं आहे. यावरून राऊतांनी सरकारवर टीका केली. त्यावर नितेश राणे यांनी भाष्य केलं आहे. हा काय नाश्ता पाहिजे विचारायला जातो काय? एक लक्षात घ्या ह्या काही अडथळे सगळ्या विषयांमध्ये येतात. तरी अधिकारी राजीनामा देतात. कधी कुठे उशीर होतो. पण राज्य सरकार म्हणून महायुतीच्या सरकार म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणारच. या काही छोट्या मोठ्या घटना घडत असतील. पण आमचं सरकार त्याच्यावर तोडगा काढणारच, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.