नागपूर हिंसाचारात 61 वाहनांचे नुकसान, भरपाई म्हणून मिळणार ‘इतकी’ रक्कम
नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत ६१ वाहनांसह मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा सुरू केला असून, पूर्णपणे जळालेल्या वाहनांसाठी ५०,००० रुपये तर कमी नुकसान झालेल्यांसाठी १०,००० रुपये भरपाई जाहीर केली आहे.

राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरुन वाद सुरु आहे. यावरुन नागपुरात दोन गट आमने-सामने आले. त्यावेळी दगडफेक, जाळपोळ अशा हिंसक घटना घडला. या घटनेचा मास्टरमाईंड मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष फहीम खान असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात झालेल्या हिंसाचारात 61 वाहनांची तोडफोड करण्यात आली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. सरकारी पंचनाम्यानुसार, या हिंसाचारात 36 कार, 22 दुचाकी, एक क्रेन आणि एका घराचे नुकसान झाले आहे.
नागपुरात झालेल्या या हिंसाचाराप्रकरणी जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तींची वाहने पूर्णपणे जळाली आहेत त्यांना 50 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून दिली जाणार आहे. तर कमी नुकसान झालेल्या वाहनांसाठी 10 हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाईल. तसेच ज्यांनी विम्याचा लाभ घेतला आहे, त्यांना मात्र ही रक्कम दिली जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
घटना औरंगजेबामुळे नव्हे, तर चादर जाळल्यामुळे – प्यारे खान
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या निदर्शनांदरम्यान जाळण्यात आलेली चादर कुठून आली, याचा तपास पोलीस करत आहेत. माझ्यावर आणि पोलिसांवर आरोप करण्यापेक्षा जमिनीवर राहून काम करणं चांगलं आहे. ती चादर कुठून आली, याचा तपास पोलीस करत आहेत. फॉरेन्सिक तपासणीनंतर सत्य समोर येईल. ही घटना औरंगजेबामुळे नव्हे, तर चादर जाळल्यामुळे झाली आहे, असे प्यारे खान म्हणाले.
नागपूर जिल्हाधिकाऱ्यांकडून पंचनामा सुरु
नागपुरातील हिंसाचारप्रकरणी झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला जात आहे. या पंचनाम्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या हिंसाचारात ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यांच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकारी घरोघरी जाऊन पंचनामा करत आहेत. सर्वांचा लेखाजोखा तयार करत आहेत. महाराष्ट्राचे मंत्री आणि नागपूरचे प्रभारी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंचनामा सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामा सुरू केला.
नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात 61 वाहनांचे नुकसान झाले. ही नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाने 48 तासांच्या आत नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता सध्या कार्यावाही सुरु आहे.