पुतण्याचा काकावर गंभीर आरोप; अजितदादांनी जे केलं ती चोरीच, रोहित पवार यांचा निशाणा
Rohit Pawar on Ajit Pawar : कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत. तसंच सध्याच्या हिवाळी अधिवेशनावरही रोहित पवार यांनी भाष्य केलं. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचंही रोहित पवार म्हणाले.
सुनील ढगे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नागपूर | 10 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आमचं एकच मत आहे. की पत्रावर आम्ही सह्या करत असताना काय लिहिलं होतं? अजितदादा पवार हे विरोधी पक्षनेते व्हावेत, यासाठी आमच्या सह्या घेतल्या गेल्या होत्या. मात्र आता निवडणूक आयोगासमोर तोच पेपर वापरला की काय अशी शंका आम्हाला आली. तो जर पेपर त्यांनी वापरला असेल तर साध्या भाषेत याला चोरीच म्हणावं लागेल, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. नागपुरात टीव्ही 9 मराठीशी बोलताना रोहित पवार यांनी हे विधान केलं आहे.
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष
दोन दिवसात अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी आणि विदर्भातील जनतेसाठी जे चर्चा व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. सरकारने निर्णय करायला पाहिजे होता. चहा-बिस्कीटची पार्टी करायला पाहिजे होती. फिरायला जायला पाहिजे होतं. आठ ते दहा दिवसाचा अधिवेशन घेता. मात्र चर्चा होत नाही. सामान्य माणसाचे विषय मागेच राहतात, अशी खंतही रोहित पवार यांनी बोलून दाखवली.
नवाब मलिक प्रकरणावर रोहित पवार म्हणाले…
नवाब मलिक हा युती विषय आहे. त्यांच्यावर जे काही आरोप झाले होते. त्यानंतर ते सत्तेच्या बाजूला ते बसले. त्यांचं सकाळी स्वागत केलं. दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं. मात्र माविकास आघाडीचे सरकार असताना त्यांच्या विरोधात जाऊन भाजपने अनेक वक्तव्य केली. मग नंतर त्यांच्या लक्षात आलं असावं म्हणून फडणवीस यांनी पत्र लिहिलं आणि ते पत्र मीडियामध्ये आलं. या माध्यमातून एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, असंही रोहित पवार म्हणाले.
युवासंघर्ष यात्रेबद्दल रोहित पवार म्हणाले…
राजकारण करणारे लोक माझ्याबद्दल काय विचार करतात. याचं घेणं देणं मला नाही. सामान्य लोकांना माझ्या बद्दल काय वाटतं आणि मला त्यांच्याबद्दल काय वाटतं, हे महत्वाचं आहे. सामान्य लोकांच्या अडचणी समजून घेतो. त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. मी खऱ्या अर्थाने समाजकारण करतोय. महत्त्वाचं म्हणजे गेल्या 22 दिवसात लोकांमध्ये गेल्यानंतर मला एका गोष्टीची जाणीव झाली आहे की, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या लोकांमध्ये क्षमता आहे. पण त्यांना तशी संधी दिली जात नाही, असं रोहित पवार म्हणाले.
सरकारच्या ज्या योजना त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही आणि यामुळे अनेक आर्थिक अडचणीमधून अख्खा महाराष्ट्रात चाललेला आहे. जनतेला मिळालं पाहिजे. ते राजकारणी लोक देत नाहीत, असं ठाम मत झालं आहे. या घटकासाठी आपल्याला काय करता येईल. यासाठी आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत, असं रोहित पवार म्हणाले.