नागपुरात सोशल मीडिया वापरण्यावर निर्बंध, पोलिसांनी रिल्स बनवणाऱ्यांना दिली सक्त ताकीद
नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी फहीम खानला अटक करण्यात आली आहे. त्याच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी ५० हून अधिक लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

नागपुरात काही दिवसांपूर्वी मोठा हिंसाचार उसळला होता. यानंतर पोलिसांनी ५० दंगलखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी फहीम खानलाही १८ मार्चला अटक करण्यात आली आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीम खान हा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. फहीम खानने जमावाला भडकवून हिंसा घडवल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. सध्या फहीम खान हा कोठडीत आहे. या हिंसाचार प्रकरणातील मुख्य सूत्रधार फहीम खानच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली. नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर आता पोलीस आयुक्तांनी काही सूचना जारी केल्या आहेत.
नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर आता पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांना विविध सूचना दिल्या. तसेच रिल्स बनवणाऱ्यांनाही त्यांनी सक्त शब्दात ताकीद दिली आहे.
युट्यूबवर आमची नजर असणार
नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर युट्यूबवर लोकांना माहिती देताना हिंसाचाराचे व्हिडीओ पोस्ट करू नये, जेणेकरून दोन समाजात तेढ निर्माण होईल. कोणाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे व्हिडीओ पोस्ट करू नये. युट्यूबवर आमची नजर असणार आहे. यापुढे अशा पद्धतीचे काही असल्यास कारवाई केली जाणार आहे. यामध्ये 114 च्या पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतलेले आहे. यातील 13 लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच आणखी लोकांना अटक करण्यात येत आहे. त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगळे गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी दिली.
सोशल माध्यमांना नजर ठेवण्यासाठी वेगळे लक्ष ठेवू नये. काही युट्युबवर कारवाई केली जाणार आहे. ज्या गुन्हेगारांवर कडक कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही गुन्हे दाखल केले आहेत. अवैध बांधकाम असल्यास नियमितपणे कारवाई करत असतो. गुन्हेगाराची जात किंवा धर्म नसते. ज्या लोकांचे नाव निष्पन्न होईल, त्यावरही अशाच पद्धतीची कडक कारवाई केली जाईल, असेही पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल म्हणाले.
सध्या परिस्थिती नियंत्रणात
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या अनुषंगाने आम्ही तयारी सुरू केली आहे. नागपुरात हिंसाचार घटनेला सात दिवस उलटले आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणि शांततेत आहे. पंतप्रधान यांच्या दौऱ्यातील सुरक्षेत कुठलीही तडजोड होत नाही. नागपूर पोलीस दौऱ्यात सुरक्षा पुरवण्यासाठी तयार आहे. पुढील काळात येणारे काही धार्मिक सण आहेत. त्यावरही आम्ही लक्ष ठेवून आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने एसपीजी टीम अजून आलेली नाही. स्थानिक पातळीवर ज्या बैठका आहे. त्या अनुषंगाने बैठक सुरू झालेल्या आहे, असेही पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी म्हटले.